

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : स्थायी समितीमध्ये प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सभापती अशोक पाटील यांच्याकडे बुधवारी (ता. ११) बंद लिफाफ्यात नवीन आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पासाठी अंदाजपत्रक सादर केले. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत अर्थसंकल्प मांडताना आयुक्तांना दिला जाणारा मान आता सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी हिरावून घेतल्याची चर्चा आहे. याआधीदेखील परिवहन उपक्रमाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक बंद लिफाफ्यात सभापतींकडे सादर करण्यात आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या या नव्या पद्धतीमुळे लोकप्रतिनिधींनी प्रशासनाविरोधात दरी निर्माण होत आहे.
नवी मुंबई महापालिकेची १९९२ मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून २०२५ पर्यंत ३३ अर्थसंकल्प प्रशासनातर्फे स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आले आहेत; परंतु यंदापासून सत्ताधाऱ्यांनी ही परंपरा बाजूला सारून अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. निवडणूक झाल्यानंतर अगदी सुरुवातीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपासून सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांचे पुतणे सभागृह नेते सागर नाईक यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अन्वये बदललेल्या नियमांचा दाखला देत सर्वाधिकार लोकप्रतिनिधींच्या हातात घेत जुन्या परंपरा बदलण्यास सुरुवात केली आहे.
३४ वर्षांच्या परंपरेला छेद
याआधी प्रशासनातर्फे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीमध्ये सादर केला जात होता. त्यानंतर महापालिका आयुक्त निवेदन वाचून दाखवत शहराकरिता तयार केलेल्या आर्थिक खर्चाच्या बाजू आणि तरतुदी सांगत असे; परंतु महापालिकेच्या ३४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींनी परंपरेला छेद दिला आहे. प्रशासनाऐवजी स्थायी समिती आठवडाभर चर्चा करून अर्थसंकल्पीय तरतुदींसह सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत.
आयुक्त अनुपस्थित
आज पार पडलेल्या स्थायी समितीच्या कामकाजात आयुक्त डॉ. कैलास शिंदे हे अनुपस्थित होते. शिंदे हे जपान दौऱ्यावर असल्याचे समजते. शिंदेंऐवजी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना खर्च व शिलकीचे आकडे असलेले रकमांचे पत्रक बंद लिफाफ्यात स्थायी समितीमध्ये सादर केले.
सागर नाईकांनी सुरेश शेट्टींना गप्प बसवले
स्थायी समितीच्या कामकाजादरम्यान बोलताना सभापती अशोक पाटील यांनी सदस्य सुरेश शेट्टी यांना बोलण्याची संधी दिली. त्या वेळी शेट्टी यांनी नेरूळ येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयाबाबत समस्या बोलण्यास सुरुवात केली. यावर स्थायी समिती सदस्य सागर नाईक यांनी शेट्टी यांना मध्येच हटकून बोलण्यास मनाई केली. आपल्याला बोलू द्यावे, असा आग्रह शेट्टी यांनी नाईक यांच्याकडे धरला; मात्र अजेंड्यावर असणाऱ्या विषयांव्यतिरिक्त इतर विषय बोलायचे नाहीत, असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर सभापती पाटील यांनी शेट्टी यांनी बोलण्यास मनाई केली.
कोणाचा मान-अपमान करण्याचा प्रश्न येत नाही. अर्थसंकल्प तयार करणे आणि विविध कामांच्या तरतुदी करणे, हे स्थायी समितीचे अधिकार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या अधिकार कधीच प्रशासनाचे नव्हते. प्रशासनाने जमा, खर्च आणि शिलकीच्या रकमा स्थायी समितीकडे द्यायच्या असतात. त्यानुसार प्रशासनाने त्या रकमांचे अंदाज स्थायी समितीकडे दिले आहेत. त्यावर १६ मार्चपासून चर्चा सुरू होऊन अंतिम अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर करू.
- सागर नाईक, सभागृह नेते, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.