

‘कचरामुक्ती’साठी मास्टर प्लॅन
गायमुखमध्ये १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणारा सुमारे ११०० मेट्रिक टन कचरा प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी पालिकेने आता कचऱ्याचे विकेंद्रित पद्धतीने वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आराखड्यानुसार घोडबंदर येथील गायमुख जकात नाक्याच्या जागेवर पहिला मोठा प्रकल्प आकाराला येत असून, येथे १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे.
ठाण्यात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये ६० टक्के ओला आणि ४० टक्के सुका कचरा असतो. सध्या हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत (८० टन) आणि कौसा (१० टन) येथे प्रक्रिया केली जाते. मात्र, उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. सध्या शहरातील बहुतांश कचरा भिवंडीतील आतकोली येथे टाकला जात आहे. घोडबंदर भागातील गायमुख येथील जकात नाक्याच्या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प आकार घेत आहे. प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून ५० कोटींचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामालाही सुरूवात झाली आहे.
घोडबंदरमध्ये कचरा उचलण्याचे नवे वेळापत्रक
घोडबंदर भागातील गायमुख येथे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. तसेच, घोडबंदर भागातील गृहसंकुले आणि रहिवाशांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करुन घेतला जाणार आहे. तसेच, महापालिकेच्या माध्यमातून देखील तशाच पध्दतीने त्या कचऱ्याची वाहतूक करणार आहे. ओला कचरा रोजच्या रोज व सुका कचरा आठवड्यातून दोन ते तीन दिवस उचलला जाणार आहे.
नियोजित प्रकल्प
१ गायमुख क्षेत्रफळ ४ हजार ८०० चौ.मी इतके असून त्यापैकी ४ हजार १८० चौ.मी जागेवर कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे नियोजन आहे.
३ नागला बंदल येथे देखील १०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
२ डायघर येथे महापालिका सद्यस्थितीत कचरा टाकत नसली तरी देखील या ठिकाणी महापालिका आता ३०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. याठिकाणी ब्रिक्स तयार केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
आतकोलीत ६७ कोटींचा प्रकल्प
आतकोली येथील प्रकल्पासाठी १० वर्षांची निविदा काढून कार्यादेश देण्यात आले आहेत. ६७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक व इतर वस्तू वेगळ्या केल्या जातील. पुढील पाच ते सहा महिन्यांत हा प्लांट कार्यान्वित होण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.