वाड्यात प्रथमच ससे पालन व्यवसाय सुरू
वाड्यात ससेपालन व्यवसायाचा यशस्वी प्रयोग
खैरे येथील पाटील कुटुंबीयांनी केले पालन
वाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील खैरे येथील सुशिक्षित तरुण शेतकरी विनोद पाटील यांनी आपल्या स्वतःच्या जागेत पत्र्याची शेड उभारून ससेपालन व्यवसायाला सुरुवात केली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा उपक्रम त्यांनी सुरू केला असून परिसरातील शेतकऱ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी पाटील यांनी सिंधदुर्ग येथील ससेपालन करणाऱ्या व्यावसायिकांची भेट घेऊन सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर नियोजनपूर्वक हा व्यवसाय सुरू केला. तालुक्यात सुशिक्षित तरुणाने ससेपालनाचा व्यवसाय सुरू केल्याची ही पहिलीच घटना असल्याने अनेक शेतकरी या प्रकल्पाला भेट देत आहेत.
ससेपालन हा कमी जागेत करता येणारा आणि कमी खर्चाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. सशांसाठी भाताचा कोंडा, गहू, शेंगदाण्याची पेंड तसेच ओला चारा सहज उपलब्ध होतो. सध्या पाटील यांच्या प्रकल्पात न्यूझीलंड व्हाईट जातीचे सुमारे ९० ससे असून त्यात नर व मादींचा समावेश आहे.
या व्यवसायात दहा सशांचे एक युनिट तयार केले जाते. त्यामध्ये सात माद्या आणि तीन नर ठेवले जातात. साधारण ४५ दिवसांनी प्रत्येक मादी पिल्लांना जन्म देते आणि वर्षभरात पाच ते सहा वेळा पिल्ले होतात. पिल्लांचे चार महिने संगोपन केल्यानंतर त्यांची विक्री करता येते. एका युनिटमधून साधारणपणे दर ४५ दिवसांनी सुमारे १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली.
देशात विविध औषधी लसींच्या प्रयोगासाठी सशांचा वापर होत असल्याने त्यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक म्हणून ससेपालन व्यवसायाकडे वळावे, तसेच इच्छुकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यास आपण तयार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

