एपीएमसीत शेतीमालाचे दर कोसळले
एपीएमसीत शेतीमालाचे भाव कोसळले
युद्धाचा बळीराजाला फटका
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचा थेट फटका आता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गांवर आलेल्या निर्बंधांमुळे शेतमालाची निर्यात ठप्प झाली असून, निर्यातीचा हा सर्व माल स्थानिक बाजारपेठेत आल्याने भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
निर्यात थांबल्याने बाजारपेठेत भाजीपाला आणि फळांची आवक अभूतपूर्व वाढली आहे. आवक जास्त आणि मागणी कमी अशा पेचात शेतकरी अडकला आहे. काही दिवसांपूर्वी २० रुपये किलो असलेला कांदा आता १० ते १२ रुपयांवर आला आहे. सर्वाधिक फटका कलिंगडाला बसला असून, ४० रुपये किलोचा भाव थेट १० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. मंडईत मालाचे ढीग साचल्याने आणि अपेक्षित ग्राहक नसल्याने मोठ्या प्रमाणात पालेभाज्या सडू लागल्या आहेत.
हॉटेल उद्योगातील मंदीचा परिणाम
व्यापाऱ्यांच्या मते, केवळ निर्यातबंदीच नाही, तर व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे हॉटेल उद्योगावरही परिणाम झाला आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाल्याचा वापर कमी झाल्याने विक्रीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. याचा दुहेरी फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे.
शेतकऱ्यांपुढे भांडवलाचा प्रश्न
लग्नाचा हंगाम तोंडावर आहे, मुलांचे शिक्षण आणि पुढील पिकाची पेरणी करायची आहे. मात्र, सध्याच्या भावातून पिकाचा लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर याचे दूरगामी परिणाम होतील, असा इशारा व्यापारी प्रतिनिधी गणेश पोखरकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

