महामार्गावर अडचणींशी सामना
महामार्गावर अडचणींशी सामना
डहाणू-चारोटी यादरम्यान खोदकामांमुळे नागरिक त्रस्त
कासा, ता. १२ (बातमीदार)ः डहाणू-जव्हार-मोखाडा-त्र्यंबकेश्वर राज्यमार्गाच्या नूतनीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते, पण या मार्गावरील अर्धवट खोदलेल्या रस्त्यामुळे डहाणू-चारोटी मार्गावर नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महामार्गाच्या रुंदीकरण, काँक्रीटीकरणासाठी २५० कोटी रुपयांचे काम आर.के.सी. कंपनीला दिले आहे. या प्रकल्पांतर्गत चंद्रसागर ते सरावली यादरम्यान ३० मीटर रुंदीचे चौपदरीकरण, तर सरावली ते चारोटी यादरम्यान १३ मीटर रुंदीचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे, पण सध्या काम संथ गतीने सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. मात्र, हा पर्यायी रस्ता कच्चा असून, धुळीचे लोट उडत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजनेअभावी अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
--------------------------------------
२,५०० झाडांची तोड
या महामार्गावर ५३ नवीन मोऱ्या, ११ लहान पूल आणि सरोवर हॉटेल, चंद्रसागर आदी ठिकाणी चार मोठे पूल उभारण्याची योजना आहे. या कामासाठी डहाणू वन विभागातील ९७४, कासा वन परिक्षेत्रातील ७७० तसेच डहाणू नगर परिषद क्षेत्रातील ७७६ अशा २,५०० झाडांची तोड होणार आहे. तसेच रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.
------------------------------
डहाणू-चारोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम बंद पडल्यासारखे झाले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट खोदकाम केल्याने गंजाडसारख्या बाजारपेठेत धुळीचे प्रमाण वाढले असून, दुकाने, घरांमध्ये माती शिरत आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करावे लागेल.
- धनसुख प्रजापत, व्यापारी, गंजाड
------------------------------
सध्या होळीच्या सुट्ट्यांमुळे काही दिवस काम बंद होते. तसेच नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ः- मनीष चकदरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

