

वाड्यात सूर्यफूल बहरले
शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : अस्पी कृषी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान ही १९७४ पासून कृषी क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्यासाठी कार्यरत आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून शेती तंत्रज्ञान, फलोत्पादन आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षातून दोनदा रब्बी आणि खरीप हंगामात शेतकरी मेळाव्याचे त्यांच्यावतीने आयोजन करण्यात येते. यंदाही मंगळवारी (ता. १०) वाडा तालुक्यातील तानसा फार्म या ठिकाणी रब्बी हंगामातील शेतकरी मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी सूर्यफुल लागवड, आंबा घन, अतिघन लागवड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, तर शास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाणे यांनी सूर्यफुल, भाजीपाला पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी अस्पी फाउंडेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्वप्नील देखणे, मेळाव्याचे अध्यक्ष अस्पी फाउंडेशनचे संचालक किरण पटेल, कल्पेश जाधव उपस्थित होते. सूर्यफुल हे शुद्ध खाद्यतेल, उत्पादन, पेंड आणि मधमाश्यांना आकर्षित करणारे पीक असल्याने मधाचे उत्पादनही वाढत आहे. वर्षभर घरगुती तेलाची गरज भागवता येईल आणि भेसळयुक्त तेलापासून मुक्तता मिळेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने सूर्यफुलाची लागवड करून घरगुती वापरासाठी खाद्यतेलाची निर्मिती करावी, असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. भरत कुशारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनात सांगितले.
---------------------
सूर्यफूल हे तिन्ही हंगामात येणारे पीक असून, पालघर जिल्ह्यात सूर्यफुलाच्या लागवडीसाठी रब्बी अणि उन्हाळी हंगामात पोषक वातावरण आहे. मध्यम जमिनीवर ४५ बाय ३० सेमी आणि भारी जमिनीमध्ये ६० बाय ३० सेमी अंतरावर लागवड करावी. सुधारित जातीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे, तर संकरित जातीसाठी हेक्टरी पाच किलो बियाणे वापरावे. लागवडीसाठी सरी वरंबा पद्धत योग्य असून, कळी धरणे, फुल उमलते, दाणे भरण्याची अवस्था या महत्त्वाच्या अवस्था आहेत. खत व्यवस्थापन करताना अमोनिया सल्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट याचा वापर करावा. जेणेकरून सल्फर अणि कॅल्शियम हे घटक सूर्यफुलाला उपलब्ध होतील.
---------
परागीभवनासाठी मधमाश्यांची मदत :
मधमाश्यांद्वारे सर्वात जास्त परागीभवन होते. सूर्यफूल लागवडीमुळे मधमाश्या परागीभवन घडवून आणतात, त्यामुळे मधाचेही उत्पन्न वाढते आणि सूर्यफुलाच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. परिसरात मधमाश्या नसतील, तर परागीभवन होण्यासाठी फुलोरा अवस्थेत सकाळी ८ ते ११ या वेळेस एका आड एक दिवस हस्त परागीभवन करावे लागते.
----------------
कृषी शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन
आंबा घन लागवड पाच बाय पाच मीटर अंतरावर करावी, अति घन लागवड करताना जिल्ह्यातील हवामानानुसार जास्तीत जास्त चार बाय तीन मीटरवर लागवड करावी. लागवडीसाठी केशर जात उत्कृष्ट आहे. परागीकरण उत्तम होण्यासाठी तोतापुरी, पायरी, रत्ना या जातीचे काही झाडांची लागवड करावी. सुरुवातीला आंबा छाटणी करून आंब्याला आकार देणे महत्त्वाचे, त्यासाठी एका वर्षाचे कलम शासकीय नर्सरीतून आणून लागवड करावी. आंबा खत, पाणी व्यवस्थापन, मोहर व्यवस्थापन करून अधिक उत्पादन घेणे शक्य होते.
सूर्यफूल लागवडीचे फायदे :
१) सूर्यफुलाच्या फुलांची तोडणी करून त्यातील बिया काढून त्यातील तेल काढणाऱ्या घाण्याद्वारे गाळले जाते.
२) तेल गाळून झालेल्या चोथ्याचा (पेंडीचा) उपयोग शेतीला खतासाठी करता येतो, तसेच जनावरांना खाद्य म्हणून वापरण्यात येतो.
३) बियांमध्ये ३५ ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण असते.
४) मधमाशी पालन व दुग्धव्यवसाय तसेच पीक बदलाचा मुख्य पिकावरही सकारात्मक परिणाम दिसून येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.