

उल्हासनगर, ता. १२ (बातमीदार) : महापालिकेची सर्वसाधारण महासभा १८ मार्चला महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड आणि विविध विशेष समित्यांची रचना करण्यावर चर्चा होणार आहे. याबाबतची माहिती महापालिका सचिव अनंत जवादवार यांनी दिली.
महासभेत विषय क्रमांक १ आणि २ चे गोषवारे सादर करण्यात येणार आहेत. दरम्यान, सभागृहातील संख्याबळात काही बदल झाल्यास त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल, असेही जवादवार यांनी स्पष्ट केले. महासभेत महापालिकेच्या प्रशासन व विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. जानेवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमधून स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती सदस्य असणार, विशेषतः शिवसेना व भाजपचे किती सदस्य स्थायी समितीत स्थान मिळवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच महासभेत विविध विशेष समित्यांची रचना करण्याचाही विषय मांडण्यात येणार आहे. शहरातील विविध विभागांशी संबंधित कामकाज अधिक प्रभावी पार पाडण्यासाठी या समित्या कार्यरत असतात. त्यामध्ये शिक्षण, महिला व बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, क्रीडा, महसूल आदी विषयांशी संबंधित समित्यांचा समावेश असतो. या समित्यांवर कोणत्या नगरसेवकांची नियुक्ती होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
वंचितच्या प्रतिनिधींना संधी?
महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सुरेखा सुरेश सोनवणे आणि विकास खरात हे दोन नवखे उमेदवार निवडून आले आहेत. पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि युवानेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार सभांमुळे शहरात वंचितला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्ष मोनू पवार आणि प्रवक्ते सोनू पवार यांनी सत्तेत भागीदारीच्या अटीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती किंवा विशेष समित्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनाही संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.