भिवंडीत अनेक भागात पाणी टंचाईचे चटके

भिवंडीत अनेक भागात पाणी टंचाईचे चटके

Published on

भिवंडीत पाणीचोरीचा विळखा
मागणी १६२ एमएलटी, पुरवठा मात्र १२०
भिवंडी, ता. १२ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका क्षेत्रात पाणी वितरण व्यवस्थेतील प्रचंड गळती आणि वाढत्या पाणीचोरीमुळे शहराला पाणीटंचाईचे तीव्र चटके बसू लागले आहेत. सुमारे १४ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराला दररोज १६२ एमएलटी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १२० एमएलटी पाणी उपलब्ध होत आहे. त्यातच औद्योगिक कारणांसाठी होणाऱ्या पाणीचोरीमुळे सामान्य नागरिकांच्या वाट्याचे पाणी परस्पर पळवले जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

पाणी वितरणातील नियोजनाच्या अभावामुळे कामतघर, ब्राह्मण आळी, कासार आळी, ठाणगे आळी, कोंबडपाडा, साठे नगर, गायत्रीनगर, नूरी नगर आणि शांतीनगर यांसारख्या बहुसंख्य भागांत अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच ही परिस्थिती असल्याने आगामी काळात टंचाई अधिक भीषण होण्याची भीती व्यक्त होत आहे. २००७ मध्ये मंजूर झालेली ‘२५ एमएलटी’ पाणीपुरवठा योजना आणि खासगी सहभागातील ‘वारणा धरण प्रकल्प’ पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या १६ पाणी साठवण टाक्यांपैकी आठ टाक्या आजही कोरड्या असून, त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. या टाक्यांमध्ये पाणी कोठून आणणार, याचा कोणताही ठोस आराखडा प्रशासनाकडे नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे.

औद्योगिक पाणीचोरीचे मोठे रॅकेट
शहरात डाइंग आणि सायझिंग उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी केली जात आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने ९० पाणीचोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, चोरीचे अवाढव्य प्रमाण पाहता ही कारवाई नगण्य ठरत आहे. ग्रामीण भागासाठी स्टेमच्या मुख्य जलवाहिनीवरून होणारा उपसादेखील शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करत आहे.

वाढती लोकसंख्या आणि रमजान महिन्यामुळे पाण्याची मागणी २५ टक्क्यांनी वाढली आहे. स्टेमच्या जलवाहिनीवरून ग्रामीण भागासाठी होणाऱ्या पाणी उपसामुळे शहराच्या वितरणावर ताण येत आहे. तरीही उपलब्ध साठ्यातून सर्वत्र सुरळीत पुरवठा करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करत आहे.
- संदीप पटनावर, कार्यकारी अभियंता, भिवंडी महापालिका.

भिवंडीचे ‘वॉटर ऑडिट’
एकूण गरज : १६२ एमएलटी
सध्याचा पुरवठा : १२० एमएलटी (स्टेम : ७३, मुंबई मनपा : ४२, वऱ्हाळ तलाव : ५)
तूट : ४२ एमएलटी
मुख्य अडथळे : औद्योगिक पाणीचोरी, नादुरुस्त साठवण टाक्या आणि वितरण गळती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com