विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सह्याद्री फार्म येथे अभ्यास दौरा

विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सह्याद्री फार्म येथे अभ्यास दौरा
Published on

विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सह्याद्री फार्म येथे अभ्यास दौरा

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय विक्रमगड यांच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्म (ता. दिंडोरी) येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात तालुक्यातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा दौरा उपयुक्त ठरला.
अभ्यास दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना सह्याद्री फार्मची अत्याधुनिक संरचना, व्यवस्थापन पद्धती आणि शेतमाल हाताळणीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. फळे व भाजीपाल्याचे उत्पादन, वर्गीकरण, स्वच्छता, पॅकिंग आणि निर्यात प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने कशा राबवल्या जातात याचे सविस्तर मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पॅकहाउस सुविधा, शीतगृह साखळी व्यवस्था, गुणवत्ता तपासणी प्रणाली आणि आधुनिक यंत्रसामग्री यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
या वेळी शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन कसे करता येते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. प्रक्रिया उद्योगांमुळे शेतमालाला अधिक बाजारमूल्य मिळते तसेच निर्यातक्षम उत्पादन तयार करता येते, याविषयी तज्ज्ञांनी उदाहरणांसह माहिती दिली. आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा वापर, करार शेती, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीओ) महत्त्व आणि संघटित शेती व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना जलसंधारण आणि शाश्वत शेतीविषयक उपक्रमांचीही माहिती देण्यात आली. पाण्याचे योग्य नियोजन, मृदसंवर्धन तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धती, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय, मूल्यवर्धन प्रक्रिया आणि बाजारपेठेतील संधी याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत आधुनिक पद्धत अवलंबण्याचा मानस व्यक्त केला.
या अभ्यास दौऱ्याचे नियोजन तालुका कृषी अधिकारी जगदीश दोंदे आणि उपकृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रभाकर सांबर, प्रशांत गावित, भोंडवे आदी अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्याच्या संधी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या उपक्रमामुळे विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातक्षम उत्पादन यांची नवी दिशा मिळाली असून, भविष्यात अशा अभ्यास दौऱ्यांचे आयोजन अधिक प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com