खानावळ आणि छोट्या धंदेवाल्यांमध्ये गॅस सिलेंडर तुटवडामुळे धास्तावले
गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे खाणावळ आणि स्टॉलधारक धास्तावले
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प होत असल्याने मुंबईतील खाणावळी व छोटे खाद्यपदार्थ विक्रेते धास्तावले आहेत. अनेक खाणावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तर स्टॉल बंद ठेवावा लागत असल्याळे छोटे खाद्यपदार्थ व्यावसायिक तसेच वडापाव, चहा स्टॉलचालकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. या खाणावळीच्या जेवणार अवलंबून असणाऱ्या हजारो ग्राहकांच्या जेवणाची आबाळही होत आहे.
अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरप्रमाणेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हॉटेल, खाद्यपदार्थ स्टॉल तसेच घरगुती खाणावळ चालविणाऱ्या चालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतील कुर्ला, गोवंडी, चेंबूर, शिवाजीनगर, देवनार, भांडुप, टिळकनगर, मानखुर्द तसेच पालिका एम-पश्चिम विभागातील उपाहारगृहे, घरगुती खाणावळी, चहा व इतर स्टॉलधारकांना तात्पुरत्या स्वरूपात सेवा बंद करावी लागली आहे. गॅसपुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे ग्राहकांच्या ऑर्डरनुसार खाद्यपदार्थ तयार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
दुकानाचे भाडे, कर्मचारी पगार आणि इतर खर्च कायम असताना उत्पन्न एकाएकी कमी झाल्यामुळे खाणावळ व छोट्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. अपुरा गॅसपुरवठ्याअभावी वेळेवर स्वयंपाक करता येत नाही. खाणावळ सुरू ठेवण्याची वेळ कमी करावी लागत आहे. या सर्वांमुळे खाणावळ बंद करावी लागली असल्याची खंत खाणावळचालक संगीता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. मी मुंबईतील शेकडो घरगुती खाणावळीत अंसख्य मुंबईकर जेवतात. पालिकेत काम करणारे यशवंत शेळके दररोज घरगुती खाणावळीत जेवतात; मात्र गॅस तुटवड्यामुळे खाणावळी बंद होत असल्याने जेवणाची आबाळ झाल्याचे ते सांगतात.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आर्जव मुंबईतील खाणावळचालकांनी केले आहे. खाणावळीप्रमाणे अनेक उपाहारगृह, छोट्या-मोठ्या वडापाव स्टॉलधारकांची परिस्थिती आहे. त्याला उपाय म्हणून काही जणांनी इंडक्शन व कोळशावरील शेगड्या विकत घेऊन, आपले काम सुरूच ठेवण्याची धडपड करीत आहेत.
व्यवसाय बंद केला तर ग्राहक टिकणार नाहीत. सिलिंडर मिळत नसल्याने पर्याय म्हणून कोळशावरील शेगडी विकत घेतली आहे. त्यावर चहा व इतर पदार्थ तयार करून विक्री सुरू ठेवणार आहे.
- दीपक सायकर, मालक, सायकर हॉटेल
...
खाणावळीत जेवण वेळेवर मिळत नाही. बराच वेळ थांबावे लागते. अनेक वेळा एखादी खाणावळ बंद असल्यास दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. जे खिशाला परवडणारे नाही.
- गौतम मोरे, ग्राहक
.......
चहाच्या व्यवसायावर उपजीविका चालते; पण सध्या गॅस सिलिंडर मिळत नसल्याने चहाचा स्टॉल बंद ठेवला आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास उपासमारीची भीती आहे.
- संदीप कदम, चहाविक्रेता
...........
कित्येक वर्षांपासून वडापाव आणि भजी-पावचा धंदा करतो. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे धंदा बंद ठेवावा लागत आहे.
- मुकुंद साळवे, वडापाव विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

