पालिका शाळांमध्ये आता दर शुक्रवारी वाचन उपक्रम

पालिका शाळांमध्ये आता दर शुक्रवारी वाचन उपक्रम

Published on

पालिका शाळांत वाचनाचा जागर
दर शुक्रवारी वाचन तासिका; ५२ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

कल्याण, ता. १४ ( वार्ताहर) : शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि भाषा समृद्धीसाठी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान पुरेसे नाही, ही बाब लक्षात घेत कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांमध्ये आता दर शुक्रवारी विशेष वाचन उपक्रम राबवण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणार आहे. या नवीन उपक्रमांतर्गत प्रत्येक शुक्रवारी शाळेच्या परिपाठानंतरची पहिली तासिका ही पूर्णपणे ‘वाचन तासिका’ म्हणून राखीव ठेवली जाईल. या वेळेत विद्यार्थी वृत्तपत्रे, कथासंग्रह, चरित्रे आणि निवडक साहित्याचे वाचन करतील. केवळ वाचनच नव्हे, तर वाचलेल्या विषयाचे आकलन करून त्यावर विचार मांडण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

शुक्रवारी (ता. १३) या उपक्रमाला सुरुवात झाली. महापालिका क्षेत्रातील २५२ शाळांमधील सुमारे ५२ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. हा उपक्रम आता नियमितपणे सुरू राहणार असून, शाळा स्तरावर वेळोवेळी वाचन स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. वाचन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्व-अभ्यासाची सवय लागेल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा विश्वास महापालिकेचे प्रशासन अधिकारी भारत बोरनारे आणि शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी व्यक्त केला. सर्व शिक्षकांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

उपक्रमाची वैशिष्ट्य
वेळ : दर शुक्रवारी परिपाठानंतरची पहिली तासिका
साहित्य : वृत्तपत्रे, कथा, कविता आणि निवडक प्रेरणादायी साहित्य
व्याप्ती : २५२ शाळा आणि ५२ हजार विद्यार्थी
उद्देश : भाषेवर प्रभुत्व मिळवणे आणि अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com