नागरिकांनी वणवा रोखण्यासाठी दक्ष राहावे

नागरिकांनी वणवा रोखण्यासाठी दक्ष राहावे

Published on

नागरिकांनी वणवा रोखण्यासाठी दक्ष राहावे
डॉ. दत्ता कुंटेवाड यांचे आवाहन
तळा, ता. १४ (बातमीदार) : कोकणात उन्हाळ्याची चाहूल लागताच डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. रायगड जिल्ह्यातील तळा तालुका हा डोंगराळ व वनसंपत्तीने नटलेला भाग असल्याने येथील निसर्गसंपदा तसेच आंबा-काजू बागांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी वणवा लागणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी केले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात अज्ञातांकडून किंवा मानवी हलगर्जीपणामुळे डोंगरांना आग लावली जाते. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलवलेल्या आंबा व काजूच्या फळबागाही आगीत भस्मसात होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी तसेच पर्यटकांनी सतर्क राहून वणवा टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वणवा रोखण्यासाठी शेतीची मशागत करताना ‘राब’ जाळताना तो नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. वाऱ्याचा वेग पाहूनच शेतातील कचरा जाळावा तसेच फळबागांभोवतीचा पालापाचोळा साफ करून ‘फायर लाईन’ (जाळ पट्टा) तयार केल्यास डोंगरावरील आग बागेत शिरण्यापासून रोखता येते. जंगलातून प्रवास करताना पेटती काडी, सिगारेट किंवा विडीचे थोटूक फेकू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
वणव्यामुळे अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी व कीटक नष्ट होतात आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवण्यासाठी वणवा रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे डॉ. कुंटेवाड यांनी नमूद केले.
चौकट
वणवा लागल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्या
वणव्याची कोणतीही घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक वन विभाग, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीला माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळीच माहिती मिळाल्यास आग पसरण्यापूर्वी नियंत्रणात आणणे शक्य होते आणि जंगल तसेच फळबागांचे मोठे नुकसान टाळता येते. त्यामुळे निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘दक्षतादूत’ म्हणून सजग राहून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com