ठाणे शहर पोलिस भरतीत साडेपाच हजार उमेदवार गैरहजर

ठाणे शहर पोलिस भरतीत साडेपाच हजार उमेदवार गैरहजर

Published on

मैदानी चाचणीस पाच हजार उमेदवारांची दांडी
ठाणे पोलिस भरतीसाठी ७,१५२ जण लेखी परीक्षेसाठी पात्र
ठाणे, ता. १४ : ठाणे शहर पोलिस दलातील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेचा मैदानी टप्पा पूर्ण झाला असून, यामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. एकूण २१ हजार २ उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते; मात्र त्यापैकी सुमारे पाच ते साडेपाच हजार उमेदवार प्रत्यक्ष मैदानी चाचणीला गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले. या चाचणीतून तावून सुलाखून निघालेले सात हजार १५२ उमेदवार आता पुढील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

ठाणे पोलिस दलातील ६५४ रिक्त शिपाई पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. साकेत येथील पोलिस मैदानावर उमेदवारांची धावणे, लांब उडी आणि इतर शारीरिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली. सुरुवातीच्या दिवसांत दीड हजार, तर नंतरच्या दिवसांत दररोज सुमारे दोन हजार उमेदवारांची चाचणी पार पडली. कडक शिस्त आणि पारदर्शकतेच्या वातावरणात पार पडलेल्या या चाचणीत उमेदवारांनी आपला कस लावला.

तब्बल पाच हजारांहून अधिक उमेदवार गैरहजर राहिल्याने पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अनेक उमेदवारांनी एकाच वेळी विविध जिल्ह्यांत किंवा इतर विभागांतील भरतीसाठी अर्ज केले असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी चाचण्यांच्या तारखा एकाच दिवशी आल्याने किंवा अन्य भरतीला प्राधान्य दिल्याने उमेदवारांनी ठाणे पोलिस भरतीकडे पाठ फिरवली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लेखी परीक्षेचे वेध
मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या सात हजार १५२ उमेदवारांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारांची आता लेखी परीक्षा होणार असून, ही परीक्षा मार्च महिन्यातच आयोजित केली जाणार आहे. लेखी परीक्षेची निश्चित तारीख उमेदवारांना लवकरच अधिकृतपणे कळवण्यात येईल, अशी माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.

भरती प्रक्रियेचा आढावा
एकूण रिक्त पदे : ६५४ (पोलिस शिपाई)
एकूण प्राप्त अर्ज : २१,००२
गैरहजर उमेदवार : सुमारे ५,५००
लेखी परीक्षेसाठी पात्र : ७,१५२
पुढील टप्पा : लेखी परीक्षा (मार्च २०२६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com