पामबीच मार्गावरील डिजिटल होर्डिंगची आमदारांकडून पाहणी
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : पामबीच मार्गावरील सिग्नलच्या ठिकाणी उभारल्या जात असलेल्या डिजिटल जाहिरात फलकांवरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी नागरिकांसह करावे येथील टी. एस. चाणक्य चौकात पाहणी दौरा केला. सिग्नलच्या रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांची त्यांनी पाहणी करत या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
पाम बीच मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणा अत्याधुनिक करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या मधोमध तब्बल ६८ सिग्नल ठिकाणी डिजिटल जाहिरातींसाठी मोठ्या फलकांची उभारणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगाड्यांवर डिजिटल जाहिराती दाखविण्याची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. या वेळी आमदार म्हात्रे म्हणाल्या, की अशा प्रकारचे डिजिटल होर्डिंग उभारण्यापूर्वी महाराष्ट्र सागरीकिनारा नियामक प्राधिकरण (एमसीझेडएमए), पर्यावरण विभाग, तसेच नवी मुंबई वाहतूक पोलिसांची परवानगी आवश्यक असते; मात्र या होर्डिंगसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी दिलेली नाही. या पाहणी दौऱ्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेवक राजू शिंदे, प्रवीण भगत, मिलिंद भोईर, जयवंत तांडेल, पुण्यनाथ तांडेल, योगेश तांडेल, प्रकाश मुकादम, मनोज म्हात्रे, सुहासिनी नायडू तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अधिवेशनात मुद्दा उपस्थित
रस्त्याच्या मध्यभागी भडक आणि चलचित्र स्वरूपातील जाहिराती दाखवल्यास वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असून अपघाताचा धोका वाढू शकतो. अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक फलक नियमबाह्य असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या विषयावर त्यांनी गुरुवारी (ता. १२) अर्थसंकल्पी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर संबंधित मंत्री माधुरी मिसाळ यांनी येत्या आठ दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

