वीर वाजेकर महाविद्यालयात मुलींसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम
वीर वाजेकर महाविद्यालयात मुलींसाठी आरोग्य जागृती कार्यक्रम
पीसीओडीसह महिलांच्या आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन
उरण, ता. १४ (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय, फुंडे येथील हेल्थ क्लब आणि तु. ह. वाजेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या विविध आरोग्य समस्यांबाबत जागरूकता कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर होते. या वेळी प्राचार्य बी. बी. साळुंखे, शिक्षिका थोरात, पाटोळे आदी उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रणाली नामदेव दांडेकर (एमडी, स्त्रीरोग व प्रसूती-आयुर्वेद), सहाय्यक प्राध्यापक, डॉ. जी. डी. पोळ फाउंडेशन, वायएमटी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खारघर, नवी मुंबई यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी मुलींच्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत जनजागृती वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. प्रणाली दांडेकर यांनी पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) या महिलांमध्ये आढळणाऱ्या हार्मोनल समस्येबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांची लक्षणे, कारणे, प्रतिबंध व उपचार याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सुमारे १५० हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
चौकट
जीवनशैलीत बदल करून पीसीओडीवर नियंत्रण
खराब जीवनशैली, ताणतणाव व शारीरिक निष्क्रियतेमुळे पीसीओडीचा धोका वाढतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने व वजन नियंत्रण यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येते, असे मार्गदर्शन डॉ. दांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. योगेश कुलकर्णी यांनी केले.

