४८ तासांनंतरही नळ कोरडेच
पनवेल, ता. १४ (बातमीदार) : आधीच अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) मोठ्या शटडाऊनमुळे प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत कामे, स्थापत्य दुरुस्ती, जलवाहिन्यांची देखभाल आणि नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी जाहीर केलेला ३६ तासांचा शटडाऊन संपल्यानंतरही प्रत्यक्षात ४८ तासांहून अधिक काळ अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मजीप्राने न्हावा-शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गुरुवार (ता. १२) सकाळी ९ वाजल्यापासून शुक्रवार (ता. १३) रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची सूचना दिली होती. या काळात नागरिकांनी आगाऊ पाणी साठवून ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले होते; मात्र अनेक भागांत दोन दिवसांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही नळांना पाणी न आल्याने घराघरांत अडचणी निर्माण झाल्या. या शटडाऊनचा सर्वाधिक फटका कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल, करंजाडे, वडघर, विचुंबे, बेलवली-वारदोली, नांदगाव-कुडावे या भागांना बसला. अनेक ठिकाणी नागरिकांनी दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा करून ठेवला होता; परंतु तिसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने साठा पूर्णतः संपला. त्यामुळे घरगुती वापर, स्वयंपाक, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत पाणीपुरवठा नियमित झाला नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे मजीप्राने शटडाऊननंतरच्या पुनर्पुरवठ्याचे अचूक वेळापत्रक जाहीर करावे, पर्यायी टँकर व्यवस्था वाढवावी आणि प्रभावित भागांना प्राधान्याने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बाटल्यांची कमतरता
कळंबोलीतील के. एल. टाईप एलआयजी वसाहत, सेक्टर १४ आणि सेक्टर १५ या भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली. सकाळपासून नागरिक नळाला पाणी येण्याची प्रतीक्षा करत होते; परंतु अनेक इमारतींमध्ये पाण्याचा थेंबही आला नाही. परिणामी, नागरिकांनी बाजारातून मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या. किरकोळ दुकाने आणि स्थानिक विक्रेत्यांकडे बाटलीबंद पाण्याची मागणी अचानक वाढल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत काही ठिकाणी बाटल्यांची कमतरता जाणवू लागली.
महिलांचे हाल
महिलावर्गाला या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला. घरगुती कामकाज, मुलांच्या शाळेची तयारी, स्वयंपाक आणि पिण्याचे पाणी यासाठी अतिरिक्त ताण सहन करावा लागला. अनेक सोसायट्यांमध्ये मोटारी बंद पडल्या, तर काही ठिकाणी टाक्यांमधील शेवटचा साठाही संपल्याने नागरिकांना एकमेकांकडून पाणी मागण्याची वेळ आली.
प्रशासनावर नाराजी
करंजाडे परिसरातही अशीच स्थिती निर्माण झाली. येथील अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहिल्याने टँकरवर अवलंबून राहावे लागले. काही ठिकाणी सोसायट्यांनी तातडीने खासगी टँकर बोलावले; त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागला; मात्र प्रशासनाने नियोजनबद्ध पर्यायी व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
रामदास शेवाळे यांच्याकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा
नगरसेवक रामदास शेवाळे यांनी नागरिकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी स्वखर्चाने पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. प्रभाग क्रमांक आठमधील केएल-२ परिसरात अनेक इमारतींमध्ये दोन दिवसांहून अधिक काळ पाणी आले नव्हते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच शेवाळे यांनी तातडीने खासगी टँकरची व्यवस्था करून पाणी वितरण सुरू केले. या उपक्रमामुळे महिलांसह स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला.
नागरिकांची नाराजी
शटडाऊनची सूचना देताना ३६ तास सांगितले जातात; परंतु प्रत्यक्षात त्यानंतर किती वेळ पाणी येणार नाही, याबाबत स्पष्टता नसते. उन्हाळ्याच्या तोंडावर अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे प्रशासनाची निष्काळजी आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. याबाबत प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

