ठाणेकरांना घेता येणार बोटिंग, मासेमारीचा आनंद

ठाणेकरांना घेता येणार बोटिंग, मासेमारीचा आनंद

Published on

ठाणेकरांना घेता येणार बोटिंग, मासेमारीचा आनंद
१५ तलाव ठेक्याने देण्याचा पालिकेचा मानस

ठाणे, ता. १४ : ‘तलावांचे शहर’ अशी ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांच्या कायापालटासाठी आणि महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील १५ तलाव मासेमारी आणि बोटिंग सुविधेसह खासगी ठेक्याने देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर (महासभा) ठेवण्यात आला असून, यामुळे ठाणेकरांना मनोरंजनाचे नवे साधन उपलब्ध होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३७ तलाव आहेत. या तलावांच्या स्वच्छता, देखभाल आणि बोटिंग सुविधेसाठी पालिकेला दरवर्षी ३५ ते ४० लाख रुपये खर्च करावे लागतात. हे तलाव ठेक्याने दिल्यास हा देखभालीचा खर्च वाचणार असून उलट महापालिकेला भाड्याच्या स्वरूपात निश्चित उत्पन्न मिळणार आहे. नागरिकांना स्वच्छ परिसरात बोटिंग आणि मासेमारीचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

जुन्या प्रयोगातून धडा
यापूर्वी २०१७ मध्ये पालिकेने सहा तलाव ठेक्याने देण्यासाठी निविदा काढल्या होत्या. त्या वेळी कचराळी, कौसा, खारेगाव आणि न्यू शिवाजीनगर (कळवा) या तलावांना चांगला प्रतिसाद मिळाला होता; मात्र फडकेपाडा आणि मखमली तलावाबाबत ठेकेदार फारसे उत्सुक नव्हते. त्यानंतर काढलेल्या निविदांनाही प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. आता १५ तलावांच्या या मोठ्या प्रस्तावाद्वारे पालिका पुन्हा एकदा खासगी क्षेत्राला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ७९ अंतर्गत हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. १५ मार्चनंतर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत याला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळाल्यास, निविदा प्रक्रिया राबवून तलाव सुशोभीकरणासह मासेमारी व बोटिंगसाठी खुले होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com