अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी
अंबरनाथ पालिकेत महायुतीमध्ये खडाजंगी
शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक!
अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस अंबरनाथ नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत चव्हाट्यावर आली आहे. तब्बल आठ वर्षांच्या दीर्घकाळानंतर शुक्रवारी (ता. १३) पार पडलेली ही पहिलीच सभा शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे वादळी ठरली. शिवसेनेने आपल्या संख्याबळाच्या जोरावर भाजप नगरसेवकांच्या प्रभागांतील विकासकामांना विरोध दर्शविल्याने अंबरनाथमध्ये महायुतीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व ५९ प्रभागांत प्रत्येकी २५ लाख रुपयांची समान विकासकामे करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र ३२ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या शिवसेनेने याला जोरदार विरोध केला. यावर नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत खासदारांना ‘व्हिजन मॅन’ म्हणणाऱ्या पक्षाच्या नगरसेवकांनी विकासाला विरोध करणे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत शिवसेनेवर निशाणा साधला.
भाजप नगरसेवक अभिजित करंजुले यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीचा दाखला देत शिवसेनेला भाजपच्या मतांची गरज नाही का, असा सवाल उपस्थित केला. याला उत्तर देताना शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी भाजपवर स्वार्थी राजकारणाचा आरोप केला. उपनगराध्यक्षपद आणि काँग्रेस नगरसेवकांचा भाजप प्रवेश यावरून दोन्ही पक्षांत आधीच धुसफूस सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नये, अशी मागणी शिवसेनेचे राजेंद्र वाळेकर यांनी केली. व्हिडिओ एडिट करून निवडणुकीत गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चिंचपाडा खदानीच्या ६० लाख रुपयांच्या सफाई खर्चावरून अब्दुल शेख यांनी सोन्याचा जेसीबी लावणार का, अशी बोचरी टीका केली. यावरून भाजप नगरसेवकांनी त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. या वेळी शेख यांनी तो फेटाळून लावत खर्चाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. बाबासाहेब पुरंदरे नाट्यगृह वापरण्यासाठी स्वीकृत नगरसेवक सुभाष साळुंखे यांची एनओसी घ्यावी लागते, असा धक्कादायक आरोपही या वेळी करण्यात आला.
विकासावर अनिश्चिततेचे सावट
या राजकीय संघर्षात कैलास कॉलनी आणि चिंचपाडा तलावाच्या सफाईला प्रशासकीय गरज म्हणून मंजुरी मिळाली असली, तरी प्रभागामधील २५ लाखांची कामे रखडली आहेत. पावसाळा तोंडावर असताना सत्ताधारी आणि मित्रपक्षातील या वादामुळे अंबरनाथमधील नागरी कामे अधांतरी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

