एकाच दिवशी तीन युवकांना ट्रेनने चिरडले, संशयास्पद मृत्यू असल्याचा नातेवाईकांचा आरोप, पालघरमधील घटना

एकाच दिवशी तीन युवकांना ट्रेनने चिरडले, संशयास्पद मृत्यू असल्याचा नातेवाईकांचा आरोप, पालघरमधील घटना

Published on

रेल्वेने तीन युवकांना चिरडले
संशयास्पद मृत्यू असल्याचा नातेवाइकांचा आरोप

पालघर, ता. १४ ः एकाच दिवशी एकाच वेळी एकाच ठिकाणी राहणाऱ्या तीन युवकांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्घटना पालघरमध्ये शुक्रवारी (ता. १३) घडली. हे तिन्ही युवक पालघर पूर्वेकडील वीरेंद्रनगर परिसरात राहणारे असून, तिन्ही जणांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १४) संध्याकाळच्या सुमारास काही साध्या वेशातील पोलिस तिघा तरुणांचा पाठलाग करीत होते. पोलिसांच्या भीतीने हे तिघे तरुण स्वत:चा बचाव करीत पालघर रेल्वे स्टेशननजीक जैन मंदिर परिसराच्या लोहमार्गाजवळ आले. तेथे रेल्वे रूळ ओलांडत असताना भरधाव मालगाडीने या तिन्ही तरुणांना चिरडले, असा आरोप तरुणांच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. मात्र असे काही घडले नसून तिघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, स्वप्नील शैलेश पालांडे (२३), कुणाल कुमार दुबळा (२३) आणि अफरोज खलील शेख (२८) या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेतील नेमकी वस्तुस्थिती अद्याप समोर आली नसून, पोलिस चौकशीनंतरच प्रमुख कारण समजणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
...............
तिघांना मारहाण?
दरम्यान, मृत्यू झालेल्या तिघांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करीत तिघांना मारहाण केल्याचे सांगितले आहे. यानंतर पाठलाग होत असताना हे तरुण धावत पुढे गेले आणि लोहमार्ग ओलांडत असताना मालगाडीखाली येऊन तिघांचा मृत्यू झाला, असे नातेवाइकांनी म्हटले आहे. मुलांकडून चूक झाली असल्यास त्यांना पकडून कायदेशीर शिक्षा करणे आवश्यक होते. पाठलाग करणारे ते कोण आहेत, हे आम्हाला माहिती नव्हते. मात्र त्यांना मारहाण करून अशा पद्धतीने भीती दाखवल्यामुळे त्यांचा जीव गेला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींना समोर आणण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com