शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवणारे महापेतील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त;

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवणारे महापेतील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त;

Published on

महापेतील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त
दोन अटकेत; शेअर मार्केटमधील जादा नफ्याच्या प्रलोभनाने फसवणूक
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महापे येथील एका बोगस कॉल सेंटरवर नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकला. आर्थिक गुप्तवार्ता पथक आणि सायबर सेलने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत एक कोटी दोन लाख ५८ हजार ८१८ रुपयांची फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणातील दोन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली.
महापे येथील एका इमारतीत एक संशयास्पद कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती आर्थिक गुप्तवार्ता पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज गोरे आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभय काकड यांना मिळाली. त्यानुसार १२ मार्चला आर्थिक गुप्तवार्ता पथक आणि सायबर सेलने संयुक्तपणे महापेतील या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकला. डीजी शेअर मार्केट रिसर्च या नावाने चालणाऱ्या या कंपनीत २२ तरुण-तरुणी संगणकावर बसून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हे कर्मचारी लोकांना इंट्राडे आणि इक्विटी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देऊन जास्तीच्या परताव्याचे स्वप्न दाखवत असल्याचे तपासात आढळले. तसेच आरोपी नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पेमेंट लिंक्स पाठवून फसवणुकीची रक्कम कंपनीच्या व स्वतःच्या खात्यासह इतर १८ वेगवेगळ्या बँक खात्यांत वळवत असल्याचेही तपासात आढळले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनसीसीआरपी पोर्टलवर या खात्यांची तपासणी केली असता, देशभरातून अशाच प्रकारच्या पाच तक्रारी आधीच नोंदवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी शिवम विनोदकुमार दुबे (२९) व सुजित मसिचरण वाल्मीकी (३०) यांना अटक केली. या गुन्ह्यातील तिसरा मुख्य आरोपी सूरज दुबे हा सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील, रवींद्र जाधव, गणेश जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com