समुद्री शैवाल शेती फायदेशीर

समुद्री शैवाल शेती फायदेशीर

Published on

समुद्री शैवाल शेती फायदेशीर
किनारी मच्छीमारांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुरू करण्यात आलेल्या समुद्र शैवाल (सीवीड) शेतीमुळे स्थानिक मच्छीमार कुटुंबांना नव्या उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स कंपनी डीपी वर्ल्डच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, रायगड किनारपट्टीवर आतापर्यंत २५० हून अधिक समुद्र शैवाल लागवड युनिट्स उभारण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे मच्छीमार कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्याबरोबरच महिला बचत गटांचाही या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे.
हवामान बदलामुळे पारंपरिक मासेमारीवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर किनारी भागातील मच्छीमारांना पर्यायी आणि शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे महाराष्ट्रातील पहिला समुद्र शैवाल प्रकल्प राबविल्यानंतर अलिबाग तालुक्यातील मांडवा आणि सारळ परिसरात मच्छीमारांच्या सहकार्यातून या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत सध्या एका चक्रात सुमारे २० ते २५ टन ओल्या समुद्र शैवालाचे उत्पादन घेतले जात आहे. प्रकल्पाचा विस्तार होत असल्यामुळे हंगामाच्या अखेरीस हे उत्पादन ५० ते ७५ टनांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समुद्र शैवालापासून औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, सौंदर्यप्रसाधने तसेच विविध औद्योगिक उत्पादनांसाठी उपयोगी घटक तयार केले जात असल्याने त्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
या उपक्रमाला आयएनईसीसीचे सहकार्य लाभले असून, क्लायमा क्रीव संस्था मच्छीमारांना समुद्र शैवाल शेतीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहे. या प्रकल्पामुळे समुद्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असून, कोळंबी, खेकडे आणि लहान मासे यांसारख्या सागरी जीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण होण्यासही मदत होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. १३) मांडवा परिसरात या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी डीपी वर्ल्डचे प्रतिनिधी, क्लायमा क्रीव आणि आयएनईसीसीचे सदस्य तसेच स्थानिक मच्छीमार आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी समुद्र शैवाल शेतीच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आणि मच्छीमारांशी संवाद साधला.
चौकट
हवामान बदलावर प्रभावी उपाय
समुद्र शैवाल शेती ही हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर किनारी समाजासाठी महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. या शेतीमुळे किनारी समाजाला हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणारी शाश्वत उपजीविका मिळते. लोकांना शाश्वत उपाय उपलब्ध झाल्यास ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि त्यांच्या परिसरातील पर्यावरणीय संतुलनही अधिक मजबूत होते, असे डीपी वर्ल्डचे प्रादेशिक संचालक सी. एम. मुरलीधरन यांनी सांगितले.
आयएनईसीसीचे कार्यकारी संचालक मायरोन मेंडेस यांनी सांगितले, की किनारी समाजासाठी हवामान बदल ही केवळ चर्चा नसून रोजच्या आयुष्यातील वास्तव आहे. मासेमारीतील घट, अनिश्चित हंगाम आणि उपजीविकेतील अस्थिरता यामुळे मच्छीमारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत समुद्र शैवाल शेती हा असा पर्याय आहे, जो उत्पन्न वाढवतानाच समुद्राच्या आरोग्यालाही मदत करतो.
क्लायमा क्रीवच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवलीना भट्टाचार्जी यांच्या मते, समुद्र शैवाल हा असा जैवस्रोत आहे जो जमीन किंवा गोड्या पाण्याविना समुद्रातच शाश्वत पद्धतीने उत्पादन करता येतो. त्यापासून उच्च मूल्याची उत्पादने तयार होतात आणि ती पूर्णपणे जैवविघटनशील असल्याने पर्यावरणासाठीही उपयुक्त ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com