ज्येष्ठ अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचे निधन
मुंबई, ता. १४ : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधू मल्होत्रा यांचे शुक्रवारी (ता. १३) मुंबईत निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. वाढत्या वयानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगी राखी आणि जावई असा परिवार आहे.
ओशिवरा स्मशानभूमीत दुपारी ४.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर तसेच त्यांचे चाहते उपस्थित होते. १९७० आणि ८०च्या दशकात मधू यांनी आपल्या सहज अभिनयाने आणि प्रभावी पडद्यावरील उपस्थितीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केले. ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची विशेष दखल घेण्यात आली होती. तसेच ‘कर्ज’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय ‘विश्वनाथ’ या चित्रपटात त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत काम केले होते, जो त्यांच्या कारकिर्दीतील उल्लेखनीय टप्पा मानला जातो. पुढे त्यांनी ‘रिश्ता कागज का’, ‘कयामत’, ‘हीरो’ अशा विविध चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. काही काळानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहू लागल्या असल्या तरी त्यांच्या जुन्या चित्रपटांतील भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

