फर्या रोगाची दहशत
फर्या रोगाची दहशत
मोखाड्यात २५ हून अधिक जनावरांचा मृत्यू
मोखाडा, ता. १५ (बातमीदार) ः तालुक्यात फर्या रोगाने दहशत माजवली आहे. या आजाराने महिनाभरात २५ हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच नवे संकट आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मोखाड्यातील सूर्यमाळ, किनिस्ते, जोगलवाडी, सायदे, शेळकेवाडी, राजेवाडीसह परिससरातील जनावरांना फर्या रोगाने ग्रासले आहे. या आजारात मांडीला, गळ्याला सूज येणे, तोंडाला फेस, ताप अशी लक्षणे आढळून येतात. आतापर्यंत या रोगाने २५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये गाई, बैल, लहान वासरांचा समावेश आहे. सूर्यमाळ येथील पशुपालक शेतकरी अनिल मोरे यांच्या तीन गाईंचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. तर जोगलवाडी येथील प्रकाश उंबरसाडे, चंद्रकांत घाटाळ यांचे शेतात काम करणारे दोन बैल दगावले आहेत. किनिस्ते गावातील दगडू जोशी, राघो वाघ, लक्ष्मण काळदिंडा यांच्या प्रत्येकी दोन गाई दगावल्या आहेत. या गावात मृत जनावरांचा आकडा मोठा असल्याने पशुपालक शेतकरी गाई-गुरांसह रानातच मुक्कामी राहत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे अंश प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत; मात्र त्याचा अहवाल मिळाला नसून फर्या रोगाची लक्षणे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
-----------------------
प्रशासनाविरोधात रोष
- जोगलवाडी शेळकेवाडी, राजेवाडी १६ पशुपालक शेतकऱ्यांचे गाई, बैल, शेळी २५ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. पालघर जिल्हा दुग्धविकास आयुक्त व पशुसंवर्धन दुग्धविकाससह आयुक्तांना जोगलवाडी गावात येऊन बाधित पशुधनग्रस्तांची घरी भेट घेतली होती.
- पशुपालकांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले; मात्र दीड महिना उलटूनही जनावरांना वेळेवर उपचार मिळाले नसल्याने आजही शेतकऱ्यांची जनावरे दगावत आहेत. त्यामुळे प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे.
---------------------
पारंपरिक शेती अडचणीत
शासनाच्या शिरगणती अहवालानुसार तालुक्यात २३ हजार ५०० गाय, म्हैस, बैल अशी जनावरे आहेत. तर सात हजार २७९ शेळी, मेंढ्या आहेत. तालुक्यात आजही जनावरांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते; मात्र फर्या रोगामुळे शेती अडचणीत आली आहे.
-----------------------------
दोन दिवसांपूर्वी गळ्याला, मांडीला सूज आल्याने गाईचा मृत्यू झाला होता. उपचारांअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. गावात दीड ते दोन हजार पाळीव जनावरे असून वेळेवर लसीकरण झालेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
- अनिल मोरे, पशुपालक, सूर्यमाळ
------------------------------
जनावरे दगावल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. त्याची आकडेवारी तालुक्याला उपलब्ध झालेली नाही; मात्र जनावरांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मोकाट जनावरांचे लसीकरण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सतीशकुमार जाधव, सहाय्यक आयुक्त, पशुधन-दुग्ध व्यवसाय, मोखाडा

