स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर

स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर

Published on

स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर
नियमांच्या कात्रीमुळे संधी हुकणार, अनेकांचा हिरमोड
विरार, ता. १५ (बातमीदार)ः मुंबईसह राज्यातील इतर मोठ्या पालिकांमध्ये महापौरपदासह स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, वसई-विरार महापालिकेत निवडणुकांचा निकाल लागून दीड महिना लोटला तरी स्वीकृत नगरसेवक निवडीच्या अनुषंगाने कोणतीही अधिकृत हालचाल होताना दिसत नसल्याने विलंबामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
स्वीकृत नगरसेवकपदावर नियुक्ती करताना नियम धाब्यावर बसवून कोणत्याही कार्यकर्त्याची वर्णी लावली जात होती. मात्र, आता शासनाने महाराष्ट्र महापालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती) नियम, २०१२ नुसार पात्रतेच्या कठोर अटी लागू केल्या आहेत. कायदेशीर कचाट्यामुळे सत्ताधारी, विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. विशेषतः निवडणुकीत पराभूत मोठ्या नेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सत्ताधारी बविआमधूनच अप्रत्यक्ष विरोध होत आहे. पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते, इच्छुक कार्यकर्ते उघडपणे पराभूत उमेदवारांना पुन्हा संधी देऊ नका, अशी मागणी होत आहेत. भाजपमध्येही परिस्थिती वेगळी नाही. प्रभाग समित्या अस्तित्वात नसल्याने नवनियुक्त नगरसेवकांना प्रचंड अडचणी येत आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने नालेसफाई आणि इतर अत्यावश्यक कामे होणे गरजेचे आहे. जर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर पावसाळ्यात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
---------------------------------
भाजप, बविआत रस्सीखेच
भाजपकडून मनोज बारोट, बिजेंदर सिंग, महेश पाटील, यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्या बरोबरच नेहा दुबे आग्रही असल्याचे समजते. दुसरीकडे, बहुजन विकास आघाडीतून उमा पाटील, पंकज ठाकूर, हार्दिक राऊत, धनंजय गावडेंच्या नावांची चाचपणी सुरू आहे, तर दोन दिवसांपूर्वी बविआत प्रवेश केलेल्या ॲड. साधना धुरी यांची वर्णी स्वीकृत नगरसेवकपदासाठी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com