जोगेश्‍वरीत गॅस वितरणात गोंधळ

जोगेश्‍वरीत गॅस वितरणात गोंधळ

Published on

जोगेश्‍वरीत गॅस वितरणात गोंधळ
मेसेज आला, सिलिंडर नाही!
जोगेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनम नगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडर वितरणात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. भारत गॅस एजन्सीमार्फत सिलिंडर बुक केलेल्या अनेक ग्राहकांना मोबाईलवर ‘डिलिव्हर्ड’चा संदेश प्राप्त झाला; मात्र प्रत्यक्षात सिलिंडर मिळाले नसल्याने संतप्त नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी करत नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील अनेक ग्राहकांनी नेहमीप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग केले होते. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर सिलिंडर घरपोच दिल्याचा संदेश आला. मात्र, प्रत्यक्षात सिलिंडर मिळाले नसल्याने नागरिकांनी एजन्सीकडे धाव घेत स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते निरंजन अहेर यांनी सांगितले की, काही ठिकाणी डिलिव्हरी बॉईजकडून नेण्यात येणारे गॅस सिलिंडर भररस्त्यात हिसकावून घेण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकारामुळे ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचण्यात अडचणी येत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर एजन्सीच्या व्यवस्थापक प्रीती सिंग यांच्याशी चर्चा करण्यात आली. घरगुती ग्राहकांना लवकरात लवकर सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन एजन्सीकडून देण्यात आले आहे. दरम्यान, सध्या संबंधित गॅस एजन्सीचे दुकान बंद ठेवण्यात आले असून, शटरला कुलूप लावण्यात आले आहे. दुकानाबाहेर लावलेल्या फलकावर शेवटचा गॅस सिलिंडर घेतल्यानंतर २५ दिवसांनी पुढील बुकिंग सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कृपया सर्वांनी लाइनमध्ये यावे, असे आवाहनही फलकाद्वारे करण्यात आले आहे.
दरम्यान, आखाती भागातील युद्धस्थिती व पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वोदयनगर परिसरातील एका हॉटेलमालकाने सांगितले की, हीच परिस्थिती कायम राहिली, तर हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते.
म्हाडा परिसरात राहणाऱ्या अदिती बतुल्ला यांनी सांगितले की, घरगुती सिलिंडरचे बुकिंग २५ दिवसांनंतर होत असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी आधीच इंडक्शन शेगडी खरेदी करून ठेवली आहे. भविष्यात गॅसटंचाई वाढल्यास पर्यायी उपाय म्हणून त्याचा वापर करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com