महिलांच्या आरोग्यासाठी श्रमजीवी रस्त्यावर

महिलांच्या आरोग्यासाठी श्रमजीवी रस्त्यावर

Published on

वज्रेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांना रेशन दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी सोमवारी (ता. १६) ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिला मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे अनेक महिलांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना अस्वच्छ कापड किंवा अपुरे साधनांचा वापर करावा लागतो. यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग तसेच गर्भाशयाशी संबंधित विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना आरोग्य व स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणे ही गंभीर बाब असल्याने सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
सरकारमार्फत ज्या पद्धतीने रेशन दुकानदारांमार्फत गरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध करून दिले जाते, त्याच धर्तीवर रेशन दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत गरीब व आदिवासी महिलांना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलगी व महिलेला दरमहा किमान १२ सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या मागणीसाठी आदिवासी अंत्योदय व प्राधान्य रेशनिंग कार्डधारक महिलांच्या वतीने १६ मार्चला ठाणे व पालघर जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ही मागणी करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्य व सन्मानाच्या प्रश्नासाठी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या संघटक सचिव सीता घाटाळ, संघटक सचिव (व्यवस्थापन) पूजा सुरूम, ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी आणि पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पऱ्हाड यांनी केले आहे.

अर्थसंकल्पात मुद्दा
दरम्यान, श्रमजीवी संघटनेच्या माजी कार्याध्यक्षा तथा वसई विधानसभा सदस्य स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून गरीब व आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांनी या प्रश्नासाठी संघटित होऊन आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com