खारघरमध्ये  गॅस वितरण थांबवले

खारघरमध्ये गॅस वितरण थांबवले

Published on

खारघरमध्ये गॅस वितरण थांबवले
दीड हजाराहून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद
हॉटेल व्यावसायिक अडचणीत
खारघर, ता. १५ (बातमीदार) : इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खारघर परिसरात कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाला असून, सुमारे दीड हजाराहून अधिक सिलिंडरचे वितरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे.
खारघर आणि परिसरातील अनेक लहान-मोठ्या हॉटेल, खाणावळी, ढाबे तसेच फास्ट फूड केंद्रांमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून गॅस एजन्सीकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी हॉटेलमालकांनी तात्पुरत्या स्वरूपात चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी अधिक वेळ लागत असून, लाकूड व इतर इंधनाचा वापर करावा लागत असल्याने खर्चातही वाढ होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
या परिस्थितीमुळे ग्राहकांना जेवण देण्यात उशीर होत असून, काही हॉटेलमध्ये मेनू मर्यादित ठेवावा लागत आहे. दरम्यान, गॅस वितरकांनी कमर्शियल गॅसपुरवठा तात्पुरता थांबविण्यात आल्याचे स्पष्ट केले असून, घरगुती गॅसपुरवठा मात्र सुरळीत सुरू असल्याचे सांगितले आहे.
चौकट
सिलिंडर नोंदणीत वाढ
खारघरमधील काही भागांत भूमिगत गॅसवाहिनीद्वारे गॅसपुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे भविष्यात पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक नागरिक सिलिंडर नोंदणीसाठी गॅस एजन्सीकडे धाव घेत असल्याची माहिती वितरकांनी दिली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
खारघर परिसरात गॅस सिलिंडर वितरक करणाऱ्या एचपी गॅस एजन्सीने सिलिंडर पुरवठा नेहमीप्रमाणे केला जात आहे. सिलिंडर टंचाई नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केला आहे.
कोट :
सिलिंडर पुरवठा बंद केल्यामुळे लाकडाच्या सहाय्याने चुलीवर अन्न पदार्थ तयार करावे लागत आहेत. पुढील काही दिवसांत सिलिंडरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास खाणावळी चालविणे कठीण होईल.
- जालिंदर गलुगडे, हॉटेल मालक
---------------
युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलिंडर पुरवठा शासनाकडून तात्पुरता बंद केला आहे.
- पवन चांडक, प्रांत अधिकारी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com