बदलापुरात ‘दामिनी पथक’ सक्रिय
बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : शहरातील महिला सुरक्षेला बळकटी देण्यासाठी बदलापुरात ‘दामिनी पथक’ कार्यरत करण्यात आले आहे. या पथकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन दुचाकी पोलिस प्रशासनाला भेट देण्यात आल्या. बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १३) पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
ठाणे ग्रामीण युवती अध्यक्षा तसेच कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादीच्या वतीने या दोन दुचाकी दामिनी पथकासाठी पोलिस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर शहरात महिला तक्रार निवारण केंद्र आणि दामिनी पथक सुरू करण्यासाठी दामले या काही वर्षांपासून प्रयत्नशील होत्या. शासनस्तरावर तसेच पोलिस प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर बदलापुरात दामिनी पथकाची स्थापना झाली आहे.
दामिनी पथक कार्यान्वित झाल्यानंतर या पथकासाठी नेमण्यात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी दुचाकींचा ताबा घेत शहरात गस्त सुरू केली. शहरातील प्रमुख रस्ते, निर्जन भाग, शाळा-महाविद्यालय परिसर; तसेच गर्दीच्या ठिकाणी या पथकाकडून नियमित गस्त घातली जाणार आहे. महिलांची छेडछाड, अल्पवयीन मुलींना त्रास देणे; तसेच सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करण्यावर या पथकाचा भर राहणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
महिलांवरील अत्याचार रोखणे आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या पथकाचा मुख्य उद्देश आहे. शहरातील मुली व महिलांना निर्भयपणे वावरता यावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलिस सहाय्यक आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पाटील, बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, तसेच राष्ट्रवादीच्या महिला नेत्या संगीता चेंदवणकर, अनघा वारंग, नगरसेवक प्रभाकर पाटील, मंगेश जाधव यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी, महिला पोलिस कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बदलापूर पालिकेच्या सहकार्याने आणि उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांच्या पाठपुराव्यामुळे शहरात दामिनी पथक कार्यरत झाले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिस प्रशासन अधिक सतर्क राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन दुचाकी दिल्या असून लवकरच आणखी आठ दुचाकी नगरपालिकेकडून उपलब्ध होणार आहेत.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त
दोन वर्षांपासून बदलापुरात महिला तक्रार निवारण केंद्र आणि दामिनी पथक सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी भेटीनंतर काही दिवसांपूर्वी भरोसा सेल सुरू झाला आणि आता दामिनी पथकही कार्यरत झाले आहे. महिला सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
- प्रियंका दामले, उपनगराध्यक्षा, कुळगाव-बदलापूर नगरपालिका
बदलापूर : दामिनी पथकला दोन दुचाकींची भेट देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

