४८ तासांच्या आंदोलनानंतर ब्लू जेट कंपनी झुकली
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) : अंबरनाथ एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी छेडलेल्या कामबंद आंदोलनाला अखेर यश आले आहे. सलग ४८ तास चाललेल्या आंदोलनानंतर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांना तत्त्वतः मान्यता दिली. त्यानंतर लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अंबरनाथ पश्चिमेतील कल्याण-बदलापूर मार्गावरील या कंपनीत कामगारांची पिळवणूक, अत्यल्प वेतनवाढ, सुट्ट्यांचा अभाव; मूलभूत सुविधांबाबत अन्याय होत असल्याने कामगारांनी दोन दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे कंपनीतील उत्पादन व कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. कामगारांनी व्यवस्थापनाकडे विविध कामगार कायद्यांच्या आधारे मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये दरवर्षी किमान २१०० रुपयांची वेतनवाढ, नियमित साप्ताहिक सुट्टी, राष्ट्रीय व सणांच्या सुट्ट्यांचा लाभ, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देणे, दिवाळी बोनस स्वतंत्र स्वरूपात देणे, दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कामगारांना कायम नोकरी देणे, ग्रॅच्युइटीचा लाभ देणे; तसेच ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन देणे या प्रमुख मागण्या होत्या. अपघात झाल्यास तत्काळ वैद्यकीय मदत व उपचाराचा खर्च कंपनीने उचलणे, कंत्राटी व्यवस्थापन पारदर्शक ठेवणे अशा मागण्यांचाही समावेश होता. सलग दोन दिवस सुरू असलेल्या आंदोलनानंतर कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांना तत्त्वतः मान्यता देत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनावेळी कामगार प्रमुख विशाल भोसले, राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे, ओबीसी अध्यक्ष संदीप विषे, महाराष्ट्र सैनिक प्रकाश नलावडे, महाराष्ट्र राज्य श्रमिक ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन खुस्पे, प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वप्नील पाटील, राष्ट्र कल्याण पार्टीचे तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

