महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार सांगत डोंबिवलीतील कपडा व्यापाऱ्याला 14 लाखांचा गंडा

महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार सांगत डोंबिवलीतील कपडा व्यापाऱ्याला 14 लाखांचा गंडा

Published on

कपडा व्यापाऱ्याची १४ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार असून, नवीन कनेक्शनसाठी १२ रुपये पाठवा, असे सांगत सायबर गुन्हेगाराने एका कपडा व्यापाऱ्याची १४ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अरुण भगवान मोरे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
डोंबिवलीत अरुण मोरे यांचा कपडे विक्रीसह खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या महिन्यात दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीने त्यांना संपर्क केला. मी महानगर गॅसमधून बोलत असून, आपल्या भागात नवीन गॅसवाहिनी टाकायची असल्याचे तो सांगू लागला. त्यासाठी आॅनलाइन १२ रुपयांची मागणी केल्यावर मोरे यांनी त्यासाठी नकार दिला. दोन दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने संपर्क करीत १२ रुपये पाठविण्याचा आग्रह धरला. त्यावर मोरे यांनी त्याला संपर्क करू नका अन्यथा पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास मोरे यांच्या मोबाईलवर खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. वेगवेगळ्या आठ व्यवहारांद्वारे त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १४ लाख ४६ हजार ९८९ रुपये काढण्यात आले. आपण कोणतेही व्यवहार केले नसतानाही खात्यातून रक्कम वळती झाल्याने मोरे यांनी सतत संपर्क करणाऱ्या दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करीत त्यानेच आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार टिळकनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात डोंबिवलीतील एका महिलेलाही महानगर गॅसचे देयक भरले नाही, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन माध्यमातून मोठी रक्कम उकळल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com