वसई विकासिनी दृक् कला महाविद्यालयाचे ४० वे वार्षिक कला प्रदर्शन
कला प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे ४० वे वार्षिक कला प्रदर्शन शुक्रवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात शिल्पकार व मुंबई कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मुकेश पुरो उपस्थित होते. तसेच प्रशांत पिळगावकर (पोलो कंपनी, व्यवस्थापक, विक्री विभाग), वसई-विरार महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवक प्रकाश रॉड्रिक्स व कल्पेश मानकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेतर्फे कार्याध्यक्ष शिरीष पाठारे, विश्वस्त के. ओ. देवसी. सरचिटणीस विजय वर्तक, संयुक्त चिटणीस दिगंबर गवळी व सदस्य नरेंद्र पाटील आणि कला महाविद्यालयाचे मान्यवर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सरचिटणीस विजय वर्तक यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा संपूर्ण इतिहास मांडताना विद्यार्थ्यांची प्रगती सविस्तर मांडली. महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेचे दालन घेऊन गेल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या वेळी विविध कला स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी पोलो कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना कला साहित्य देत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
आपल्या मनोगतात प्रमुख पाहुणे मुकेश पुरो यांनी वसई विकासिनी संस्थेशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाही, त्यांनाही भविष्यात अधिक मेहनत घेण्याचे आवाहन केले. या वेळी विशेष अतिथी प्रकाश रॉड्रीक्स यांनी आपल्या मनोगतात वसई विकासिनी संस्था कलेच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले. शनिवारी (ता. १४) बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सीईओ दीपक कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पालिकेच्या नगरसेविका पुष्पा जाधव, प्रमिला पाटील, सुवर्णा पाटील, मार्शलिन चाको, निम्मी दोशी व अपर्णा पाटील उपस्थित होत्या. या वेळी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात वसई विकासिनी संस्थेचे आभार व्यक्त करताना सांगितले की, वसई विकासिनी संस्थेने आयोजित केलेल्या चारही शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक कलाशिक्षक हे वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे अशा गुणवत्तापूर्ण कला शिक्षकांना घडविणाऱ्या महाविद्यालयातील सर्व प्राधापकांप्रती व संस्थेप्रती त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

