तानसा धरण क्षेत्रातील गावांचा विकास कोसो दूर
शहापूर, ता. १६ (वार्ताहर) : मुंबई महानगराला अहोरात्र पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणक्षेत्रातील गावांच्या मूलभूत विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा नाराजीचा सूर स्थानिकांकडून उमटत आहे. त्यामुळे या गावांचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी उत्कर्ष मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांना निवेदन दिले.
मुंबई महानगराच्या अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात येत असलेल्या नव्या जलवाहिनीच्या कामामुळे धरणक्षेत्रातील अनेक गावांचे दळणवळणाचे रस्ते बाधित होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा देत संबंधित काम काही ठिकाणी रोखून धरली आहे. गावकऱ्यांनी जलवाहिनीचे काम भूमिगत पद्धतीने करून स्थानिक रस्ते सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी केली आहे.
धनंजय जाधव यांनी दिलेल्या निवेदनात धरणक्षेत्रातील गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळेची व्यवस्था करणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र उभारणे, नादुरुस्त रस्त्यांचे नूतनीकरण करणे, तसेच गावांमध्ये बसथांबे व दिवाबत्तीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि परिसराचे सुशोभीकरण करणे अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, तानसा धरणक्षेत्रातील गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक बोलावून योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुंबई महापालिकेचे जलअभियंते शेखर शिंदे आणि अनुराधा चौगुले यांनी सांगितले.
दळणवळणाचा मार्ग धोक्यात
नव्या जलवाहिनीच्या कामामुळे शेतांकडे जाणारे पारंपरिक कच्चे रस्ते व मुख्य मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तानसा धरणाखालील अघई, टहारपूर, पालिचापाडा, वेडवेहाळ, टाकीपाडा, मोरासपाडा आणि मलिपाडा या गावांच्या दळणवळणावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हे रस्ते बंद झाल्यास अल्प अंतराच्या प्रवासासाठीही गावकऱ्यांना तीन ते पाच किलोमीटरचा वळसा घ्यावा लागणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
आमच्या गावांना जोडणारे मुख्य रस्ते, शेतपाणंद मार्ग आणि दळणवळणाचे मार्ग नव्या जलवाहिनीमुळे बाधित होत असतील तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. ही समस्या पुढील पिढ्यांनाही भेडसावू शकते. त्यामुळे महापालिकेने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
- देवीदास भोईर, उपसरपंच, ग्रामपंचायत टहारपूर
शहापूर : उत्कर्ष मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी महापौर रितू तावडे यांना निवेदन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

