मध्य रेल्वेची ‘मक स्पेशल’ ठरतेय गेमचेंजर
मध्य रेल्वेची ‘मक स्पेशल’ ठरतेय गेमचेंजर
५९५हून अधिक वॅगनद्वारे ११.६४ लाख कचऱ्याच्या पिशव्या हटवल्या; स्वच्छ रुळांमुळे लोकलसेवा अधिक सुरळीत
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेची सुरक्षितता आणि वेळेवर धावणारी सेवा अबाधित ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे रुळांवरील कचरा हटविण्याची नियमित मोहीम सुरू आहे. ‘मक स्पेशल’ गाड्यांच्या माध्यमातून एप्रिल २०२५पासून आतापर्यंत तब्बल ११ लाख ६४ हजार १४० कचऱ्याच्या पिशव्या हटविण्यात आल्या असून, यासाठी ५९५ हून अधिक वॅगन (मक रेक) वापरण्यात आले आहेत. या सातत्यपूर्ण स्वच्छता मोहिमेमुळे रेल्वे मार्ग अधिक स्वच्छ होत असून, तांत्रिक अडथळे कमी होण्यास मदत होत आहे.
रेल्वे रुळांलगत टाकला जाणारा प्लॅस्टिक कचरा, घरगुती टाकाऊ वस्तू, झाडाझुडपांचा कचरा तसेच बांधकामातील मलबा ही रेल्वेसमोरील मोठी समस्या ठरते. विशेषतः पावसाळ्यात हा कचरा नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करून रुळांवर पाणी साचण्यास कारणीभूत ठरतो. परिणामी सिग्नल यंत्रणेवर परिणाम होतो, लोकल गाड्या उशिरा धावतात आणि काही वेळा वाहतूक विस्कळित होण्याचाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने स्वच्छतेला प्राधान्य देत ही मोहीम सातत्याने सुरू ठेवली आहे.
मुख्य मार्गावर या मोहिमेत सर्वाधिक काम करण्यात आले आहे. या मार्गावर १० लाख ३७ हजार ४९० कचऱ्याच्या पिशव्या हटवून २७१ मक स्पेशल गाड्यांच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. रुळांलगत साचलेला कचरा टप्प्याटप्प्याने हटवत रेल्वे मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला.
हार्बर मार्गावरही तितक्याच गांभीर्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथे एक लाख २६ हजार ६५० कचऱ्याच्या पिशव्या हटविण्यात आल्या असून, त्यासाठी ३२४.५ मक स्पेशल गाड्या चालविण्यात आल्या. या उपक्रमामुळे हार्बर मार्गावरील अनेक संवेदनशील ठिकाणी स्वच्छता राखण्यात यश आले आहे.
स्वच्छ रूळ, सुरक्षित प्रवास
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्वच्छ रेल्वे रूळ म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे, तर सुरक्षिततेचीही हमी आहे. रुळांवर कचरा नसल्यास देखभाल कामे अधिक वेगाने करता येतात, तांत्रिक बिघाडाची शक्यता कमी होते आणि रेल्वेसेवा अधिक विश्वासार्ह बनते.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवासी तसेच रुळांलगत राहणाऱ्या नागरिकांनी रेल्वे परिसरात कचरा टाकू नये, असे आवाहन केले आहे. काही ठिकाणी जनजागृती फलक, सूचना तसेच दंडात्मक कारवाईद्वारे स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. स्वच्छ रुळांमुळे सुरक्षित प्रवास हा उद्देश ठेवून मध्य रेल्वेची ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.
मुख्य मार्ग - महिनावारी आकडेवारी
महिना - पिशव्या - मक वॅगन
एप्रिल - १,२५,००० - ३०
मे - ९०,००० - २५
जून - १,५०,००० - ३५
जुलै - ८५,००० - २०
ऑगस्ट - ९५,००० - २५
सप्टेंबर - १,४०,००० - ३०
ऑक्टोबर - १,१०,००० - २८
नोव्हेंबर - १,०२,००० - २०
डिसेंबर - १,००,४९० - २८
एकूण हटविलेल्या पिशव्या : १०,३७,४९०
एकूण मक स्पेशल गाड्या: २७१
हार्बर मार्ग - महिनावारी आकडेवारी
महिना
महिना - पिशव्या - मक वैगन
एप्रिल - १५,००० - २०
मे - १२,००० - १८
जून - १८,००० - २५
जुलै - १०,५०० - २०
ऑगस्ट - १४,००० - २२
सप्टेंबर - १८,१५० - २५
ऑक्टोबर - १०,००० - २०
नोव्हेंबर - १३,००० - १९
डिसेंबर - १२,००० - १५
एकूण हटविलेल्या पिशव्या : १,२६,६५०
एकूण मक स्पेशल गाड्या: ३२४.५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

