रेशन दुकानातून महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची मागणी

रेशन दुकानातून महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची मागणी

Published on

महिलांच्या आरोग्यासाठी ‘श्रमजीवी’चे आंदोलन
रेशन दुकानातून मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची मागणी

जव्हार, ता. १६ (बातमीदार) : राज्यातील गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी रेशन दुकानांतून दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, याबाबत जव्हार तालुका श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सोमवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता जव्हार तहसील कार्यालयात विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार लता धोत्रे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरी करून उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणींमुळे मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे अनेक महिलांना शक्य होत नाही. परिणामी काही महिलांना अस्वच्छ कापड किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग तसेच गर्भाशयाशी संबंधित गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे. मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत नैसर्गिक आणि महत्त्वाचा विषय असून, या काळात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना स्वच्छता आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने रेशन दुकानांच्या माध्यमातून गरीब, आदिवासी व कातकरी महिलांना दरमहा किमान १२ सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देण्याची योजना तातडीने सुरू करावी. तसेच आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून मासिक पाळीबाबत स्वच्छता व आरोग्य जनजागृती मोहीम राबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

--------------
वाड्यातही श्रमजीवी रस्त्यावर
ठाणे व पालघरच्या विविध ठिकाणांसह श्रमजीवी संघटनेच्या वतीने वाड्यातही महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या विनंतीसाठी वाडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी वाडामधील अनेक महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. महिलांच्या आरोग्यासाठी श्रमजीवी आपला लढा असाच कायम ठेवणार असल्याची माहितीही या वेळी श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com