नियमबाह्य वाहन भत्ता लाटणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करा

नियमबाह्य वाहन भत्ता लाटणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करा

Published on

वसई-विरार महापालिकेत वाहन भत्ता घोटाळा; संबंधित अधिकाऱ्यांकडून वसुलीची मागणी

विरार, ता. १७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून वाहन भत्त्याच्या नावाखाली होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख तथा माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र शासनाने नवीन वाहने खरेदीवर निर्बंध घातले असताना, २०१७ मध्ये महापालिकेने अधिकाऱ्यांना स्वतःचे वाहन वापरण्यासाठी दरमहा ४० ते ७५ हजार रुपयांचा भत्ता मंजूर केला होता. मात्र, अनेक अधिकारी हा भत्ता घेत असतानाही प्रत्यक्षात पालिकेच्या भाड्याच्या गाड्यांचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, काही अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी पिक-अप आणि ड्रॉप सेवेसाठी सरकारी वाहनांचा वापर केला जात असून, प्रसंगी अग्निशमन दलाच्या वाहनांचाही यात समावेश असल्याचे सांगितले जाते. या प्रकाराला सुदेश चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करून नियमबाह्य लाभ घेतलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून घेतलेला संपूर्ण भत्ता व्याजासह वसूल करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्त आणि महापौरांकडे लेखी स्वरूपात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या गैरव्यवहाराचे ठोस पुरावे समोर येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com