सोलापूर व वसई विरार शहर महानगरपालिका पूर्णवेळ पदापासून उपेक्षित ?

सोलापूर व वसई विरार शहर महानगरपालिका पूर्णवेळ पदापासून उपेक्षित ?

Published on

पूर्णवेळ नगररचनाकार उपसंचालकाची मागणी
वसई-विरार महापालिकेतील अनेक कामे रखडली

विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेतील नगररचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या निलंबनानंतर रिक्त झालेल्या पदावर सोलापूर महापालिकेतील उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांना हा कार्यभार सोपवण्यात आला. मात्र, सोलापूर महापालिकेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने फक्त आठवड्यातील तीनच दिवस ते महापालिकेत उपस्थिती दर्शवत असल्याने महापालिका क्षेत्रातील असंख्य नागरिकांची कामे रखडल्याचे चित्र सध्या येथे पाहण्यास मिळत आहे.
सोलापूर महापालिका क्षेत्रात भिष्णूरकर यांची कार्यपद्धती नावाजली गेली आहे. त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना वसई-विरार महापालिकेत पाठवण्यात आले. मात्र, सोलापूर महापालिकेतील आयुक्तांनी अद्याप त्यांना कार्यमुक्त न केल्याने मागील अनेक दिवस ते वसई-विरार ते सोलापूर असा ४४० किमी लांब खडतर प्रवास करत दोन्ही महापालिकांचे काम नित्यनेमाने पाहत आहेत, पण असे करत असताना वसई-विरारमधील नगररचना विभागाचे कामकाज धीम्या गतीने सुरू असल्याचे स्थानिक सांगत आहेत. त्याला गती मिळावी म्हणून उपसंचालक भिष्णूरकर यांनी पूर्णवेळ कामकाज पहावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान, महापालिकेच्या नगररचना विभागाला पूर्णवेळ उपसंचालक मिळावा म्हणून स्थानिक आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सरकार दरबारी पत्रव्यवहार करत उपसंचालकाची मागणी केली. त्यानंतर मनीष भिष्णूरकर यांची वसई-विरार पालिकेत बदली करण्यात आली. मात्र, या गोष्टीला पाच महिने उलटल्यानंतरही सोलापूर महापालिकेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
--------------
पूर्णवेळ उपसंचालकाची मागणी

उपसंचालक भिष्णूरकर हे वसई-विरार महापालिकेत बुधवारी दुपारी ३ ते ५ या वेळेतच नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतात. मात्र, या कालावधीत ते अनेकदा महापालिकेचे अभियंते, अधिकारी व शहरातील वास्तुविशारदांच्या भेटीगाठीसाठी व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना भेटायला आलेल्या नागरिकांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांशी अनेकदा वाद घडतात. नगररचना विभागाचे उपसंचालक फक्त तीन दिवसच महापालिकेत उपस्थित का असतात, असा संतप्त सवाल नागरिकांनी आमदार स्नेहा दुबे यांच्यासह पालिका आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी व महापौर अजीव पाटील यांना विचारला आहे. महापालिकेला तीन दिवसांचा उपसंचालक नव्हे, तर पूर्णवेळ निवासी उपसंचालक मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.

=========================================
वसई-विरार महापालिकेत उपसंचालक हे तीन दिवसच असतात. ते पूर्ण वेळ मिळावे हा महत्त्वाचा विषय मी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सविस्तर मांडला आहे. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठकदेखील व्हावी, यासाठी मी स्वतः आग्रही आहे. लवकरच आपण ही बैठक घेत आहोत. जेणेकरून वसई-विरार महापालिका नगररचना विभाग व त्यासंबंधीचे प्रश्न, अडचणी व नागरिकांच्या व शहर नियोजनाबाबतच्या अन्य प्रश्नाची उकल होण्यास मदत मिळेल.
- स्नेहा दुबे-पंडित, वसई विधानसभा, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com