गॅस सिलिंडरचा तुटवडा

गॅस सिलिंडरचा तुटवडा

Published on

वाशी/नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : ऐरोली, दिघा आणि घणसोली परिसरात सध्या गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली असून, नागरिकांना सिलिंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक गॅस एजन्सींवर ग्राहकांची गर्दी होत आहे.

आखाती देशांतील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने एजन्सीकडे उपलब्ध साठा मर्यादित आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून उपलब्ध गॅसपैकी घरगुती सिलिंडरला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी ऑनलाइन बुकिंग करूनही दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण थेट एजन्सीकडे जाऊन सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीचा मोठा फटका व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून असलेल्या हॉटेल, खाणावळी, ढाबे आणि केटरिंग व्यवसायिकांना बसत आहे. या परिसरातील अनेक एजन्सींनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता बंद केल्याने या व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काही हॉटेलचालकांकडे जुना साठा असल्यामुळे काम सुरू असले तरी पुढील काही दिवसांत गॅस न मिळाल्यास व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक व्यावसायिकाचे हॉटेल बंद झाले आहे. लग्नसमारंभ व विविध कार्यक्रमांसाठी स्वयंपाक करणाऱ्या केटरिंग व्यवसायिकांनाही अतिरिक्त सिलिंडर मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

नियमानुसार गॅस बुकिंग
गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठा साखळीत काही अडचणी निर्माण झाल्यामुळे सध्या मर्यादित प्रमाणात सिलिंडर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियमानुसार गॅस बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, ऐरोली, दिघा आणि घणसोली परिसरात गॅस सिलिंडरचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे.

सिलिंडर संपल्यामुळे घरात स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता गॅस एजन्सीकडे जाऊन सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लवकरात लवकर गॅस मिळाला नाही, तर घरातील दैनंदिन कामे करणे अवघड होईल.
- श्वेता हट्टी, गृहिणी

व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यामुळे खाणावळ बंद करण्यात आली आहे. आता कोणताच पर्याय नाही. सिलिंडर उपलब्ध होईल, तेव्हा खाणावळ उघडण्यात येईल.
- वसंत म्हेत्रे, हॉटेल व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com