गॅससाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा
पनवेल, ता. १६ (बातमीदार) : इंधन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे पनवेल आणि परिसरामध्ये घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गॅस मिळेल की नाही, पुरवठा थांबेल का किंवा दर वाढतील का, अशा विविध चर्चांमुळे अनेक ग्राहक रिकामे सिलिंडर घेऊन थेट गॅस एजन्सीसमोर दाखल होत आहेत. परिणामी पनवेलमधील गॅस वितरण केंद्रांबाहेर दिवसभर मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून विशेषतः सकाळच्या वेळेत एजन्सीसमोर नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. काही ठिकाणी आपला क्रमांक लागावा म्हणून ग्राहकांनी आधीच सिलिंडर रांगेत ठेवून प्रतीक्षा सुरू केली आहे. या रांगांमध्ये महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आज घेतला नाही तर उद्या सिलिंडर मिळेल का, या भीतीने काही नागरिकांनी नियमित तारखेपूर्वीच सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीकडे धाव घेतल्याचे दिसून आले.
पनवेल परिसरामध्ये घरगुती गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर काही निर्बंध आल्यामुळे हॉटेल व खाणावळ व्यवसायावर काही प्रमाणात मर्यादा आल्याचे सांगण्यात आले. सध्या नागरिकांना साधारणपणे २५ दिवसांनी गॅस सिलिंडर मिळत असून, वितरणाच्या दिवशी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या सेवांसाठी पुरवठा सुरळीत
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास अडीच लाखांहून अधिक घरगुती गॅस ग्राहक आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी केले आहे. पनवेलमधील रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या सेवांसाठी गॅसपुरवठा सुरळीत राहील, याची विशेष दक्षता पालिकेकडून घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यावसायिक गॅसपुरवठ्याबाबतही लवकरच परिस्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यावसायिक गॅसपुरवठ्याची अडचण
तळोजा एमआयडीसी परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे. या तुटवड्याचा थेट परिणाम कारखान्यांमधील कॅन्टीन तसेच लहान खाद्यव्यवसायावर होत आहे. कॅन्टीनसाठी सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी जेवण बनविणे कठीण झाले आहे. परिणामी काही कॅन्टीनमध्ये जेवणातील पदार्थ कमी करण्यात आले असून, काही कॅन्टीन तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे. गॅस सिलिंडरची मागणी वाढल्याने काही ठिकाणी काळ्या बाजारात जादा दराने विक्री होत आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि पुरवठादारांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, म्हणून आम्ही पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे. मात्र चुलीवर स्वयंपाक करताना वेळ अधिक लागतो तसेच खर्च आणि मेहनतही वाढते.
- आतिश वाकडीकर, मालक, साईकृपा हॉटेल
पनवेल महापालिका क्षेत्रात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये तसेच गॅस वितरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी टाळावी. रुग्णालये व अत्यावश्यक सेवांसाठी गॅसपुरवठा खंडित होणार नाही, याबाबत विशेष दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. व्यावसायिक गॅसपुरवठ्याबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

