गावरान कैरीसह पन्ह्याची मागणी वाढली

गावरान कैरीसह पन्ह्याची मागणी वाढली

Published on

उन्हाच्या तडाख्यासोबत पन्ह्याला मागणी
गॅस दरवाढ आणि तुटवड्यामुळे पन्हे पाच रुपयांनी महाग

ठाणे, ता. १६ (बातमीदार): उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बाजारपेठेत गावरान कैऱ्यांचे आगमन झाले आहे. थंड पेयांना पर्याय म्हणून नागरिक पारंपरिक ‘कैरीच्या पन्ह्याला’ पसंती देत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कैरी आणि पन्हे या दोन्हीच्या दरात वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली टंचाई याचा थेट फटका या व्यवसायाला बसला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या उन्हाळ्यात १५ रुपयांना मिळणारा पन्ह्याचा एक ग्लास आता २० रुपयांवर पोहोचला आहे. लिटरचा दरही १२५ रुपयांवरून १३० रुपयांवर गेला आहे. केवळ पन्हेच नाही, तर कच्च्या कैऱ्याही महागल्या आहेत. छोट्या कैऱ्यांचा वाटा २० रुपयांवरून २५ रुपयांवर पोहोचला आहे, तर मोठ्या कैऱ्यांचा वाटा ३० रुपयांवरून ५० रुपये झाला आहे. इतर कोणत्याही महागड्या कोल्ड्रिंकपेक्षा उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कैरीचे पन्हे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सध्या गॅस सिलिंडर महागले आहेत, शिवाय अनेकदा पुरवठा वेळेवर होत नाही. यामुळे खर्चात वाढ झाल्याने आम्हाला पन्ह्याचे दर पाच रुपयांनी वाढवावे लागले आहेत. अशी प्रतिक्रिया पन्हे विक्रेते रामचंद्र गोडबोले यांनी दिली.

आदिवासीबांधवांना रोजगार
उन्हाळा सुरू झाला की कैरीपासून पन्हे, लोणचे, आमसूल, कैरी साठ आणि आंबा पोळी बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. जंगलातील गावरान कैऱ्या तोडून विक्रीसाठी आणणाऱ्या आदिवासी महिलांना या हंगामात चांगला रोजगार उपलब्ध होतो. महागाई असूनही आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या या गावरान कैऱ्यांच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com