भिवंडी पालिकेची आज पहिली विशेष सभा
नालेसफाई, कचरा प्रकल्पावर होणार चर्चा
भिवंडी पालिकेची आज पहिली सभा; राजकीय धुसफुशीमुळे स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य नियुक्ती लांबणीवर
भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भिवंडी पालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी विराजमान झाल्यानंतर तब्बल एक महिन्याने मंगळवारी (ता. १७ ) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या पहिल्याच सभेत राजकीय विषयांना फाटा देत केवळ शहर विकासाच्या आर्थिक विषयांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय ओढाताणीमुळे अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती सदस्य व स्वीकृत सदस्य निवड सध्या रेंगाळली आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याने महापौर नारायण चौधरी यांनी या कामाला प्राधान्य दिले आहे. शहरातील प्रभाग समिती एक ते पाचमधील मुख्य रस्ते, मोठी गटारे आणि सुमारे १३० नाले (ज्यांची एकूण लांबी ५० हजार २६९ मीटर आहे.) यांच्या सफाईसाठी दोन कोटी ९२ लाख ९९ हजार ५७४ रुपयांच्या खर्चाला या सभेत मान्यता दिली जाणार आहे.
नव्या महापौरांच्या निवडीनंतरच्या पहिल्या सभेत सहसा स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्यांची निवड होणे अपेक्षित असते; मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय धुसफुशीमुळे हे विषय सध्या बाजूला ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेत केवळ आर्थिक आणि नागरी सोयीसुविधांच्या विषयांवरच चर्चा होण्याची शक्यता आहे. शहर स्वच्छता आणि आरोग्य या बाबींना अग्रक्रम देण्याचा महापौरांचा प्रयत्न असला तरी नालेसफाईचे काम वेळेत आणि दर्जेदार होणार का, याकडे भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी ट्रान्सफर स्टेशन
‘स्वच्छ भारत अभियान २.०’अंतर्गत शहरात दररोज जमा होणाऱ्या ४८० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन करण्यासाठी ट्रान्स्फर स्टेशन प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी १९ कोटी ५२ लाख ३४ हजार ५७२ रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकार (३३ टक्के), राज्य सरकार (३७ टक्के) आणि पालिका (३० टक्के) असे निधीचे स्वरूप आहे. यात पालिकेच्या वाट्यातील पाच कोटी ८५ लाख ७० हजार ३७२ रुपयांच्या प्रस्तावास या सभेत मंजुरी घेतली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

