गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद
गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद
-व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशातील इंधन आणि व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर झाला आहे. त्याचा फटका आता हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. गॅसटंचाई आणि वापरावरील निर्बंधांमुळे ठाणे शहरातील सुमारे ५० ते ६० टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवण्याची वेळ आल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी सोमवारी एकत्र येत चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन केले.
युद्धामुळे इंधन आणि गॅसपुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय सरकारकडून हॉटेल व्यवसायातील गॅस वापरावर काही निर्बंध लागू केल्याचेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ही परिस्थिती कायम असल्याने अनेक हॉटेल्स व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी प्रत्यक्ष चूल पेटवून त्यावर अन्न शिजवत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काही व्यावसायिकांनी गॅसटंचाई ही केवळ पुरवठ्याअभावी नसून काळाबाजारामुळे निर्माण होत असल्याचा आरोपही केला.
दरम्यान, हॉटेल व्यवसायावर आलेल्या या संकटाचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होत आहे. अनेक हॉटेल्समध्ये काम करणारे कर्मचारी परराज्यातील असल्याने व्यवसाय ठप्प झाल्यास ते गावी परतण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात अशी परिस्थिती आधीच अनुभवावी लागल्याने आता कर्मचारी गावी जाऊ नयेत, यासाठी हॉटेलमालक प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी चुलीवर स्वयंपाक करून व्यवस्था केली जात असल्याचे हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.
गॅसचा पर्याय म्हणून काही हॉटेल्समध्ये इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन शेगड्यांचा वापर केला जात आहे. मात्र, या उपकरणांचा वापर घरगुती पातळीवर किंवा मर्यादित प्रमाणातच शक्य असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. हॉटेलमध्ये दिवसभर ग्राहकांची मोठी ये-जा असल्यामुळे इंडक्शनवर मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणे व्यवहार्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूर्वी सुमारे सहा हजार रुपयांना मिळणारी इंडक्शन शेगडी आता २० हजार रुपयांपर्यंत विकली जात असल्याने बाजारात काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

