खालापूरत ग्रामीण भागातील हजारो कुटुंब गॅसवर. ४५ दिवसाचा कालावधी मुळे उपासमारीची वेळ येणार
खालापूरत ग्रामीण भागातील हजारो कुटुंब गॅसवर
४५ दिवसांच्या कालावधीमुळे उपासमारीची वेळ येणार
खालापूर, ता. १५ (बातमीदार) ः अमेरिका इस्राईल विरुद्ध इराण युद्धाचे चटके आता सर्वसामान्यांना जाणवू लागले आहेत. युद्धाची धग सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचली आहे. गॅस सिलेंडर वितरणाच्या नवीन नियमावलीनुसार शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव केल्याने खालापूर तालुक्यातील १६२ गावे आणि १०८ वाड्यांमधील कुटुंबांना गॅस टंचाईची तीव्र झळ सोसावी लागत आहे.
पूर्वी २१ दिवसांनंतर मिळणारा गॅस सिलेंडर आता शहरी भागात २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात चक्क ४५ दिवसांनंतर मिळणार आहे. या वर्गीकरणाचा फटका सर्वाधिक ग्रामीण भागात बसणार आहे. यामुळे हजारो कुटुंबांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागातून सर्वसाधारण कुटुंबातून स्टोव्ह, चूल हद्दपार झाली आहेत. तर, आता जळाऊ लाकूड, रॉकेलही सहज उपलब्ध नसल्याने, ४५ दिवसांच्या या प्रदीर्घ प्रतीक्षेमुळे ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट आणि नियोजन कोलमडले आहे.
मोठी प्रतिक्षा
तालुक्याचे ठिकाण असलेले खालापूर शहर देखील ग्रामीण भागात मोडत असून रासायणीसारखा विकसित भाग देखील यामध्ये येत आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर मिळताना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर या उलट हाकेच्या अंतरावर असलेले खोपोलीचा शहरी भागात समावेश होत असल्याने या ठिकाणी २५ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळणार असल्याने शहरी भागातील कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भाग गाव वाड्या
खालापूर ९५ ७०
खोपोली ३१ २१
रसायणी ३६ १७
व्यावसायिक कारणाकरता लागणारा गॅस सिलेंडर पूर्णपणे बंद असून घरगुती गॅस सिलेंडरची कोणतीही टंचाई नाही. मात्र, शासनाने ग्रामीण भागातील घरगुती सिलेंडर मिळण्याची मुदत ४५ दिवस केली असून दिलेल्या मुदतीप्रमाणे सिलेंडर मिळणार आहे. खालापूर सह ग्रामीण भागातील जवळपास चार हजार घरगुती जोडण्या आमच्या एजन्सीकडे असून गॅस सिलेंडर टंचाईवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
- समीर पेंडसे, वितरक, खालापूर
खोपोली गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर घेण्यासाठी लोकांनी सकाळपासून नंबर लावून सुध्दा रिकाम्या हाताने घरी परतले. एकतर गॅस सिलिंडरची झालेली दरवाढ त्यात उन्हामध्ये उभे राहून पण सिलिंडर मिळत नसल्याने खूप हाल होत आहेत. ही उपासमार कधीपर्यंत सुरळीत होणार यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. आता गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसेल तर पुन्हा लोक झाडे तोडणार आणि चूल पेटवून उदरनिर्वाह करणार असे आता वाटत आहे.
- आसावरी घोसाळकर, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

