क्रीडांगण, गोशाळेसाठी पणनमंत्र्यांना साकडे
भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : तालुक्यातील बापगाव, देवरुंग व देवरुंगपाडा परिसरातील आरक्षित ९२ एकर क्षेत्रात प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार प्रकल्पातून गावातील पारंपरिक ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण’ आणि ‘रामकृष्णहरी गोशाळा’ वगळण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली.
बापगाव परिसरात प्रस्तावित कृषी उत्पन्न बाजार प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळणार असल्याची जाणीव ग्रामस्थांना आहे. ग्रामस्थांचा विकासकामांना विरोध नाही; मात्र या प्रकल्पाच्या आरक्षित क्षेत्रात गावातील ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण’ व ‘रामकृष्णहरी गोशाळा’ या जनभावनांशी निगडित महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश केला आहे. ग्रामस्थांच्या मते, क्रीडांगण हे गावातील युवकांसाठी खेळ, पोलिस व सैन्य भरतीची तयारी, विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी एकमेव सार्वजनिक मैदान आहे. येथे नियमित क्रीडा स्पर्धा, सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रम होत असतात. तर दुसरीकडे रामकृष्णहरी गोशाळा ही गोसंवर्धन, धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रस्तावित बाजार प्रकल्प उभारल्यास गावातील युवकांना सरावासाठी आणि ग्रामस्थांना सार्वजनिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध राहणार नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे क्रीडांगण व गोशाळा यांचे अस्तित्व कायम ठेवून संबंधित जागा प्रकल्पातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात डी. वाय. फाउंडेशनचे युवा नेते विरेन दयानंद चोरघे, ह.भ.प. देवराज महाराज केणे, दीपक केणे, माजी सरपंच देवीदास केणे, अल्पेश केणे, भूषण केणे आदींचा समावेश होता.
सकारात्मक विचार
मंत्री जयकुमार रावल यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच प्रस्तावित प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

