भादाणे-टोरंट संघर्षावर लवकरच तोडगा
भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : पडघा परिसरातील भादाणे गावात वीजवितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनी व ग्रामस्थांमधील सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. आमदार शांताराम मोरे व पोलिस अधिकारी जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
भादाणे परिसरातून एमएसडीसीएल, ट्रान्समिशन, पॉवर ग्रीड, अदानी पॉवर आदी कंपन्यांच्या उच्चदाब वीजवाहिन्या व टॉवर उभे असल्याने हे गाव प्रकल्पग्रस्त झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे गावातील जमिनींची किंमत घसरल्याचा आणि विकासकामांना अडथळा निर्माण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. गावात दररोज सात तास वीजपुरवठा खंडित ठेवला जात असल्याने नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगितले. ग्रामस्थांनी शून्य रीडिंगवर वीजबिल देण्याची मागणीही बैठकीत मांडली.
दोन्ही बाजूंच्या भूमिकांनंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी या प्रश्नावर सामंजस्याने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. गावातून ट्रान्समिशन लाईनचे जाळे गेल्याने शेतजमिनींच्या विकासावर परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन टोरंट पॉवर, महसूल विभाग आणि ग्रामस्थांच्या संयुक्त पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. येत्या आठवड्यात या सर्वेक्षणाबाबत आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीला संघर्ष समितीचे तुकाराम कथोरे, प्रवीण जाधव, उमेश कांबळे, सुभाष कथोरे, कैलास भोईर, अशोक पाटील तसेच कंपनीचे अधिकारी समीर देसाई, अमित कडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अनधिकृत वीजजोडण्यामुळे समस्या
टोरंट पॉवर कंपनीचे महाव्यवस्थापक विजय राणे यांनी कंपनीकडून वीजपुरवठा सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले. गावात अनेक ठिकाणी अनधिकृत वीजजोडण्या असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित वीजवाहिनी पोहोचवण्याचे काम सुरू असताना काही ठिकाणी ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

