करवसुलीसाठी ग्रामपंचायतींचा तगादा
करवसुलीसाठी ग्रामपंचायतींचा तगादा
शिमग्यानिमित्त गावात आलेल्या चाकरमान्यांकडून करासाठी प्रयत्न, अंतिम टप्प्यात हायटेक यंत्रणा राबवूनही वसुली नाही
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी आपला कारभार हायटेक करीत आधुनिक तंत्राचा वापर सुरू केला आहे; परंतु आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असेपर्यंत ग्रामपंचायत विभागाला आपले लक्षांक साध्य करण्यात अडचणी येत आहेत.
मागील थकबाकीसह २६० कोटी ६१ लाख रुपये पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित असते. परंतु मार्च महिना सुरू होईपर्यंत ७० टक्केही वसुली करता येत नाही. मार्च महिन्यात वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावात करदातेच सापडत नाहीत. दक्षिण रायगडमधील बहुतांश नागरिक नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरगावी असतात. त्यांच्याकडे आर्थिक वर्ष संपताना संपर्क साधता येत नाही. यामुळे शिमग्यानिमित्त गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांकडे संपर्क साधून कर वसूल करण्यास सांगत आहेत. दिलेले उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक असल्याने पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी घराघरात पोहोचत आहेत. सर्वात कमी वसुली माणगाव तालुक्यात आहे, तर सर्वात समाधानकारक करवसुली अलिबाग तालुक्यात झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सणासाठी चाकरमानी गावाकडे आलेले असताना त्यांच्याकडे पैसा असतो. घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी दाराशी आल्यावर हे चाकरमानी कोणतीही आढेवेढे न घेता कराची रक्कम देतात. मात्र इतर वेळेला गावकरी घरामध्ये सापडत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होते. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.
बहुतांश ग्रामपंचायतींचा ऑनलाइन कारभार
महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यांतील काही ग्रामपंचायतींनी ही करवसुलीची युक्ती प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यास करदात्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. करवसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ऑनलाइन पद्धतीने करवसुलीचा निर्णय घेतला. यासाठी आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या ग्रामपंचायतींनी मोबाईल ॲपदेखील आणले आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर ही बिले भरता येणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन पद्धतीने सुरू झाला आहे; तरीही आर्थिक वर्षअखेरीस कर्मचाऱ्यांना करावी लागलेली धावपळ अद्याप संपलेली नाही.
ऑनलाइन करवसुलीला अल्प प्रतिसाद
जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करावी लागते. यासाठी थकबाकीदारांना वेळोवेळी बिले भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यात ग्रामपंचायतींमध्ये अमृत ग्राम डिजिटल करप्रणाली कार्यान्वित केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून क्यूआर कोडद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी भरता येत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामपंचायतींच्या करपट्टी वसुलीत फारसा फरक पडलेला नाही.
गणपती उत्सवाच्या आधी ग्रामपंचायतींकडून घरपट्टी, पाणीपट्टीसंदर्भातील नोटीस काढल्या जातात. त्यामुळे गावाकडे येणारे करदाते तयारी करून येतात. याबरोबरच बाहेरगावी राहणाऱ्या करदात्यांना कर वेळेत भरता यावेत, यासाठी वेबसाईट तयार केली जात असून सबंधीत ग्रामपंचायतीमधील करदात्याचा क्रमांक टाकल्यावर त्याची थकबाकी, चालू वर्षाची वसुली अशी सर्व माहिती कुठेही बसून पाहता येणार आहे. या बेवसाईटचे काम सध्या सुरू आहे.
- विशाल तनपुरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

