मध्यमवर्गीयांचे मुंबईतच गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध
मध्यमवर्गीयांचे गृहस्वप्न मुंबईतच पूर्ण करणार!
मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पोलिसांच्या घरांबाबत धोरण आखणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : दहा वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मुंबईत आपले घर होईल असे स्वप्नही पाहत नव्हता; मात्र त्यांचे घराचे स्वप्न मुंबईतच पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कष्टकरी कामगारवर्ग मुंबईत टिकून राहावा, त्याला मुंबईतच घर मिळावे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाने नायगाव बीडीडी चाळीच्या जागेवर उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ सदनिकांच्या चाव्यांचे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पात्र रहिवाशांना वाटप करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या माध्यमातून मिळालेली घरे विकू नका. तुमच्या याआधीच्या पिढ्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची कहाणी सांगणारी ही घरे आहेत. ती जपा. मुंबईत राहणाऱ्यांना चांगले घर मिळावे, त्यांचे जीवनमान उंचवावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईत सध्या एक हजार एकर जागेवर पुनर्विकास प्रकल्प राबवले जात आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, अभ्युदयनगर, कामाठीपुरा, मोतीलालनगर, एसपीव्ही नगर पुनर्विकास प्रकल्प हे त्याचाच भाग आहेत. बीडीडी चाळीतूनच कामगार चळवळीला बळ मिळाले. त्यामुळे बीडीडीचा इतिहास लिहायला हवा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. नायगाव बीडीडी चाळ परिसरात भवानी माता मंदिर आहे. येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेकदा दर्शनाला यायचे. या जुन्या मंंदिराला पुनर्विकासात स्थान मिळावी, अशी मागणी आमदार कालिदास कोळंबकरांसह रहिवाशांनी केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ९०० चौरस फुटाचे भवानी माता मंदिर उभारण्याची घोषणा केली. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नेहमी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या घराचा प्रश्न आहे. नायगाव बीडीडीमध्ये ४२३ सदनिका पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे इतरांनाही घरे मिळावीत, अशी भावना इतर पोलिसांची आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या घरांबाबत समग्र धोरण तयार केले जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, महापौर रितू तावडे, आमदार कालिदास कोळंबकर, गृहनिर्माण विभागाचे अप्पर सचिव असीमकुमार गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.
----
२०२९ पर्यंत सर्वांना चाव्या!
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आतापर्यंत वरळीतील ५५६ आणि नायगाव येथील ८६४ जणांना घराचा ताबा दिला आहे. अनेक इमारतींची कामे वेगाने सुरू असून, २०२९ अखेरपर्यंत सर्व बीडीडीवासीयांना नव्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
---
एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यातील घरांचे वाटप!
नायगाव येथील ८६४ घरांचा आज ताबा दिला जात असून, दुसऱ्या टप्प्यात सुमारे ५३७ घरांचे एप्रिलमध्ये वितरण केले जाईल. वरळी येथील घरांचेही त्याच वेळे वितरण केले जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे ४,८८८ घरांचे वितरण पूर्ण झालेले असेल. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये बीडीडीच्या ५,७७८ घरांचे काम सुरू केले जाणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
----
बीडीडीवासीयांच्या दोन-तीन पिढ्या या चाळीत गेल्या आहेत; मात्र आता हेच चाळकरी टाॅवरमध्ये जात आहेत, ही अभिमानाची बाब आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
----
मुंबईच्या उभारणीत कामगारांचा मोठा वाटा आहे. वर्षानुवर्षे १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या बीडीडीवासीयांना सुसज्ज घरे मिळत आहेत. ही एक प्रकारे गुढीपाडव्याची भेट आहे.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

