७६ वर्षांपासूनच वाद निकाली

७६ वर्षांपासूनच वाद निकाली

Published on

७६ वर्षांपासूनचा वाद निकाली
जमिनीचे वारसांमध्ये समान वाटपाचे उच्च न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पुण्यातील एक एकर जमिनीवरून मागील ७६ वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर उच्च न्यायालयाने नुकताच पूर्णविराम दिला. संबंधित जमीनमालकाच्या वारसांमध्ये समान वाटप करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने हा वाद संपुष्टात आणला.

जमिनीच्या मूळ मालकाच्या वारसांमध्ये या एक एकर जमिनीवरून जवळपास आठ दशके न्यायालयीन लढा सुरू होता. त्या याचिकेवर नुकतीच न्या. फरहान दुबाश यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. निकाल देताना जमीनमालक एम. एम. एच. जानमोहम्मद यांच्या वारसांनी फेब्रुवारी १९५० मध्ये दाखल केलेल्या याचिका निकाली काढल्या. वारसांनी मालमत्तेचे वाटप आणि आपल्या हिश्श्याची मागणी या याचिकेतून केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने येरवडा येथील उर्वरित सुमारे एक एकर (४,२७१ चौ.मी.) जमिनीचे त्यांच्या वारसांमध्ये समान वाटप करण्याचे आदेश दिले. पुण्यात जानमोहम्मद यांच्या मालकीच्या दोन भूखंडांचा समावेश होता. त्यातील एक भूखंड डेक्कन महाविद्यालय येथे, तर दुसरा पुण्याच्या येरवडा परिसरात होता. मार्च १९५० मध्ये जानमोहम्मद यांच्या मालमत्तेचे प्राथमिक वाटप जाहीर केले होते. त्यानंतर राज्य सरकारने डेक्कन महाविद्यालय मार्गावरील भूखंड संपादित केला आणि त्यापोटी मिळालेली नुकसानभरपाई कायदेशीर वारसांमध्ये वाटून दिली.

इतरांचाही दावा
जमिनीच्या मूळ मालकाच्या हयातीत नियुक्त केलेल्या एका व्यवस्थापकाच्या वारसांसह इतरही अनेकांनी येरवडा येथील १६ एकर भूखंडावर आपला हक्क सांगितल्याने या जमिनीशी संबंधित वाद सुरू राहिला. १९५५ मध्ये वारसांनी आपापसांत तडजोड करून हा वाद मिटवला होता. मात्र, त्यातील एक एकर जमिनीबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने वाद उच्च न्यायालयात पोहोचला. गेल्या ७६ वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com