गारगाई प्रकल्पाला शिवसेना (ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसचा विरोध

गारगाई प्रकल्पाला शिवसेना (ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसचा विरोध

Published on

गारगाई प्रकल्पाला शिवसेना, काँग्रेसचा विरोध
समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यावर महायुती ठाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गारगाई धरण प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच खर्चात वाढ होत आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा सवाल काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. दरम्यान, समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या या प्रकल्पावर महायुती ठाम आहे. गारगाई धरण प्रकल्पाबाबत आज स्थायी समितीच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले.
मुंबईला अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे याला कोणाचाच विरोध नाही; परंतु गारगाई धरण प्रकल्पात तीन लाखांहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. सहा गावांचे पुनर्वसन करणे, कुटुंबीयांना पालिकेच्या सेवेत नोकरी देणे याबाबत काहीच स्पष्टीकरण नाही. भविष्यात पाऊस लांबणीवर पडला तर धरण कसे भरणार, असा सवाल स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी केला. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता २०४१पर्यंत मुंबईला दररोज ६,२४२ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी ४४० दशलक्ष लिटर क्षमतेचे गारगाई धरण उभारण्यात येणार आहे. गारगाई धरणामुळे अनेक झाडे, गावे बाधित होणार असून या प्रकल्पाला शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत विरोध केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या न मिळालेल्या परवानग्या आधी घ्या आणि मगच प्रकल्प पुढे सरकवा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली. मुंबईकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, यासाठी रोज १,३०० दशलक्ष लिटर पाणी गळती होते ती आधी तातडीने थांबवावी. गारगाई धरण प्रकल्प खर्चात भविष्यात वाढ होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा प्रश्‍न काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी उपस्थित केला. शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक अमेय घोले, यामिनी जाधव, भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांनीही अनेक मुद्दे मांडले. याबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत सविस्तर चर्चा केली जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
---
अतिरिक्त आयुक्तांचे सादरीकरण
या प्रकल्पाच्या कामाचे ठोस नियोजन नसल्याचे सांगत त्याचे सादरीकरण करावे, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी गेल्या बैठकीत केली होती. त्यानंतर सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गारगाई धरण प्रकल्पाचे स्थायी समितीत सादरीकरण केले. प्रकल्पाचे फायदे काय, प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार, यामध्ये किती झाडे आणि गावे बाधित होणार, त्यांचे पुनर्वसन अशी माहिती बांगर यांनी स्थायी समिती सदस्यांना दिली.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com