पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा आग्रह
डोंबिवलीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा आग्रह
नगरसेविका वेदिका पाटील यांची पाहणी
डोंबिवली, ता. १७ ः पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती आणि तुंबणाऱ्या गटारांचा प्रश्न टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक २९ मधील नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी भाजप नगरसेविका वेदिका पाटील यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.
नगरसेविका पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांसह भोलेनाथनगर, ग्रीन पार्क, शिळफाटा, ठाकूरपाडा, कल्याणफाटा, पडलेगाव, खिडकाळी, देसाई, दोस्ती, खार्डीगाव, फडकेपाडा, साबेगाव आणि साळवीनगर या भागांतील नाल्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक नाले प्लॅस्टिक कचरा, बाटल्या आणि गाळाने पूर्णतः तुंबलेले आढळले. वेळेत सफाई न झाल्यास पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. भारत गियर ते शिळफाटा या मार्गावर दरवर्षी पावसाचे पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. याचा सर्वाधिक फटका नोकरदार, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना बसतो. ही समस्या यंदा उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
उपायुक्तांकडे ‘डीप क्लिनिंग’ची मागणी
याप्रकरणी नगरसेविका पाटील यांनी पालिका उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मोठ्या नाल्यांची सफाई मशीनद्वारे करण्यात यावी. ज्या ठिकाणी यंत्रे पोहोचू शकत नाहीत, तिथे मानवी बळाचा वापर करून खोलवर सफाई करावी, अशी मागणी केली. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांतून गाळ काढल्यास संभाव्य पूरस्थिती टाळता येईल, असा विश्वास नगरसेविका पाटील यांनी व्यक्त केला.

