कुर्झे धरणावरील विश्रामगृह दुरुस्तीला प्रारंभ
कुर्झे धरणावरील विश्रामगृहाच्या दुरुस्तीला सुरुवात
आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते भूमिपूजन
तलासरी, ता. १७ (बातमीदार) : कुर्झे धरण परिसरातील विश्रामगृहाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ शनिवारी (ता. १४) उत्साहात करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते पार पडले.
आमदार निकोले यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विभागीय निधीतून या विश्रामगृहाची दुरुस्ती करण्यात येत आहे. या कामामुळे धरण परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून, येथे येणाऱ्या पर्यटकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांनाही त्याचा लाभ होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला तलासरीचे उपअभियंता प्रशांत ठाकरे, उपसभापती कॉ. नंदकुमार हाडळ, पाटबंधारे विभागाचे भुसारा तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी या विकासकामाचे स्वागत करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. पुढील काळातही अशा प्रकारची विकासकामे राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भूमिपूजनानंतर मान्यवरांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या विकासकामामुळे परिसरातील सुविधा सुधारतील, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी आमदार निकोले यांचे आभार मानले.

